National AYUSH Health Fair : भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने २५ ते २८ फेब्रुवारीदरम्यान शेगाव येथे ‘राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी शेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती; चार दिवस आरोग्य तपासणी, औषधोपचार व तज्ञांचे मार्गदर्शन
बुलढाणा : भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने २५ ते २८ फेब्रुवारीदरम्यान शेगाव येथे ‘राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी शेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
उद्घाटन सोहळ्यास महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा अजित पवार, बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील, सहपालकमंत्री संजय सावकारे, कामगारमंत्री आकाश फुंडकर, आमदार डॉ. संजय कुटे, अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन ट्रस्टचे अध्यक्ष पद्मश्री वैद्य देवेंद्र त्रिगुणा तसेच अध्यक्ष वैद्य प्रा. राकेश शर्मा यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
आयुष मंत्रालयाने या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनावर सोपविली असून, १९०७ साली स्थापन झालेली ही देशातील सर्वात जुनी आणि मोठी आयुर्वेद संस्था आहे. आयोजन समितीच्या अध्यक्षपदी महासंमेलनाचे उपाध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी महासंमेलनाने २२ राज्यस्तरीय व तीन राष्ट्रीय स्तरावरील आरोग्य मेळावे यशस्वीपणे आयोजित केले आहेत.
मेळाव्याच्या माध्यमातून आयुर्वेद, युनानी, सिद्धा, सोवा-रिग्पा, होमिओपॅथी, निसर्गोपचार आणि योग या आयुष उपचारपद्धतींचा प्रचार-प्रसार करण्यावर भर दिला जाणार आहे. चार दिवस नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार तसेच तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. वनौषधी लागवड व त्यासंबंधी मार्गदर्शनही शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आले आहे.
देशभरातील आयुष औषधनिर्माता कंपन्या या मेळाव्यात सहभागी होणार असून, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, नवीन संशोधन आणि विविध कार्यशाळांद्वारे माहिती दिली जाणार आहे. वनौषधी प्रदर्शनातून कमी खर्चात उपचारांच्या पर्यायांची माहिती नागरिकांना मिळणार आहे.
आयुष मंत्रालयाच्या विविध उपक्रमांचा उल्लेख करताना जाधव म्हणाले की, ‘देश का प्रकृती परीक्षण’ अभियानात १.३९ कोटी नागरिक सहभागी झाले असून पाच गिनीज विश्वविक्रम नोंदवले गेले. जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने पारंपरिक औषधोपचारांवरील दुसरी जागतिक शिखर परिषद दिल्लीत झाली, तर आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तही विक्रम नोंदवले गेले. आयुष औषधी केंद्रे सर्व संस्थांमध्ये सुरू करण्यासह आयुष्मान भारत योजनेत आयुष पॅकेजेसचा समावेश करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
या राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळाव्याचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले. पत्रकार परिषदेला कामगारमंत्री आकाश फुंडकर, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, आयुर्वेद महासंमेलनाचे पदाधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

