Deulgaon Raja Municipal Council! :न्यायालयीन प्रक्रियेमुळे वाढलेल्या कालावधीचा आणि प्रचारासाठी मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा पुरेपूर फायदा घेत अजित पवार गट–भाजपा–मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार माधुरीताई शिपणे यांनी देऊळगाव राजा नगरपालिकेत दणदणीत विजय मिळवत महायुतीचा गड अबाधित राखला. त्यांनी नगर विकास आघाडीच्या उमेदवार नेहाताई सुनगत यांचा निर्णायक पराभव केला.

माधुरीताई शिपणे यांचा दणदणीत विजय; नगर विकास आघाडीला धक्का
गजानन तिडके
देऊळगाव राजा : न्यायालयीन प्रक्रियेमुळे वाढलेल्या कालावधीचा आणि प्रचारासाठी मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा पुरेपूर फायदा घेत अजित पवार गट–भाजपा–मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार माधुरीताई शिपणे यांनी देऊळगाव राजा नगरपालिकेत दणदणीत विजय मिळवत महायुतीचा गड अबाधित राखला. त्यांनी नगर विकास आघाडीच्या उमेदवार नेहाताई सुनगत यांचा निर्णायक पराभव केला.
पश्चिम विदर्भातील देऊळगाव राजा नगरपालिका निवडणुकीकडे संपूर्ण विदर्भासह राज्यस्तरीय नेत्यांचे लक्ष लागून होते. न्यायालयीन प्रक्रियेमुळे काही काळ स्थगित राहिलेली ही निवडणूक अखेर २० तारखेला पार पडली. मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत चुरस कायम राहिली होती. सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांच्या विधानसभेतील विजयाने स्थानिक राजकारणात मोठी हालचाल निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर तब्बल ३० ते ३५ वर्षे एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर एकत्र येत नगर विकास आघाडी स्थापन करण्यात आली. मात्र, इतक्या वर्षांचे कट्टर विरोधक एकत्र का आले, याचे ठोस उत्तर मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आघाडी अपयशी ठरली आणि त्याचा फटका थेट निवडणूक निकालात बसला.
निवडणूक काळात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (शिंदे गट) आणि मित्रपक्षांची अनैसर्गिक युती करण्यात आली होती. मात्र, सिंदखेड राजा मतदारसंघातील राजकारणात मुरब्बी मानले जाणारे दोन्ही माजी आमदार पालिका निवडणुकीत आपला करिष्मा दाखवू शकले नाहीत.
दुसरीकडे, आमदार मनोज कायंदे यांनी मोठ्या प्रमाणावर युवकांची फळी उभी केली होती. आपल्या विधानसभेच्या सुमारे एक वर्षाच्या कार्यकाळातील विकासकामांचा प्रभाव या निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आला. त्याचा थेट फायदा महायुतीला होत पालिकेवर दणदणीत विजय मिळवता आला.

नगरसेवकांचे संख्याबळ असे
महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भाजपा आणि मित्रपक्षांचा समावेश होता. काही प्रभागांत भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात मैत्रीपूर्ण लढतीही झाल्या. महायुती (अजित पवार गट) : ९ नगरसेवक,भाजपा : ३ नगरसेवक असे एकूण महायुतीचे १२ नगरसेवक विजयी झाले तर दुसरीकडे,नगर विकास आघाडी : ७ नगरसेवक, उद्धव ठाकरे गट : २ नगरसेवक विजयी झाले. विशेष म्हणजे, काँग्रेसला यावेळी खातेही उघडता आले नाही, हा या निवडणुकीतील मोठा राजकीय संदेश मानला जात आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्ष माधुरी शिपणे यांना आमदार मनोज कायंदे, निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश थोरात यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी वैशाली डोंगरजाळ, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, वर्षा कायंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

