Vyad-Chikhli road : रिसोड तालुक्यातील व्याड ते चिखली या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास अखेर प्रारंभ झाला असून, त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त असलेल्या वाहनचालक व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यात भाजपचे युवा नेते ॲड. नकूलदादा देशमुख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणि माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या प्रभावी नेतृत्वाला यश आले आहे.

ॲड. नकुल देशमुख यांचा पाठपुरावा : माजी खासदार अनंतराव देशमुख यांची दखल
वाशिम : रिसोड तालुक्यातील व्याड ते चिखली या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास अखेर प्रारंभ झाला असून, त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त असलेल्या वाहनचालक व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यात भाजपचे युवा नेते ॲड. नकूलदादा देशमुख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणि माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या प्रभावी नेतृत्वाला यश आले आहे.
व्याड–चिखली रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. पावसाळ्यात तर परिस्थिती अधिकच बिकट होत होती. खड्ड्यांमुळे वाहने उसळणे, किरकोळ अपघात होणे, रुग्णवाहिका व शालेय वाहनांना अडचणी येणे, अशी गंभीर स्थिती निर्माण झाली होती. या समस्येबाबत व्याड व चिखली परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. व्याड येथील नागरिकांनी सुरूवातीला लोकप्रतिनिधींकडे रस्ता कामासाठी निधी देण्याची मागणी केली होती. परंतु, लोकप्रतिनिधींकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने व्याड येथील नागरिकांनी माजी जिल्हा परिषद सदस्य स्वप्नील सरनाईक यांच्याकडे धाव घेतली. रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी स्वप्नील सरनाईक यांनी व्याड येथील नागरिकांचे शिष्टमंडळ घेऊन भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार अनंतराव देशमुख व युवा नेते ॲड. नकुल देशमुख यांची रिसोड येथे भेट घेतली व रस्त्याच्या दुरवस्थेबाबत सविस्तर माहिती दिली. हा प्रश्न तात्पुरता नव्हे तर कायमस्वरूपी सोडवावा, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली. या मागणीची गंभीर दखल घेत माजी खासदार अनंतराव देशमुख व ॲड. नकुलदादा देशमुख यांनी तत्काळ वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरू केला. संबंधित विभागांशी समन्वय साधून रस्त्यासाठी पुरेसा निधी मंजूर करून घेतला. त्यांच्या प्रभावी हस्तक्षेपामुळे व्याड–चिखली रस्त्याचा प्रश्न अखेर निकाली निघाला असून प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य स्वप्नील सरनाईक, संतोष वानखडे, चिखलीचे माजी सरपंच गौतम भगत, व्याडचे उपसरपंच रामभाऊ बोरकर, गौतम वानखडे, गायकवाड, अंभोरे यांच्यासह व्याड व चिखली परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एका महिन्यात काम पूर्ण होण्याचा अंदाज
या रस्त्याचे काम येत्या एका महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता असून, यामुळे शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांचा दैनंदिन प्रवास सुरक्षित व सुखकर होणार आहे. नागरिकांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त करत माजी खासदार अनंतराव देशमुख, ॲड. नकूलदादा देशमुख यांच्या कार्यतत्परतेचे कौतूक केले आहे.

