The goal of the Sangh: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोणार शाखेतर्फे विजयादशमी व शस्त्रपूजन सोहळा ६ ऑक्टोबर २०२५ रोजी उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला संघाचे खामगाव येथील शताब्दी विस्तारक आणि भारतीय विचार मंचाचे सदस्य गजानन वायचळ हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते, तर लोणार येथील युवा सामाजिक कार्यकर्ते शंतनु प्रकाशराव मापारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

लोणार शाखेचा विजयादशमी व शस्त्रपूजन सोहळा उत्साहात
लोणार : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोणार शाखेतर्फे विजयादशमी व शस्त्रपूजन सोहळा ६ ऑक्टोबर २०२५ रोजी उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला संघाचे खामगाव येथील शताब्दी विस्तारक आणि भारतीय विचार मंचाचे सदस्य गजानन वायचळ हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते, तर लोणार येथील युवा सामाजिक कार्यकर्ते शंतनु प्रकाशराव मापारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भव्य आणि शिस्तबद्ध पथसंचलनाने झाली. गणवेशधारी स्वयंसेवकांनी घोषाच्या तालावर शहरातील मुख्य मार्गांवरून संचलन केले. या संचलनाचा मार्ग लिंबी बारव चौक, बेसिक शाळा, शिवाजी चौक, जैन मंदिर चौक, डुंगरवाल चौक, प्रताप चौक, अब्दुल हमीद चौक, महात्मा वाल्मिकी चौक, मशीद चौक, विनायक चौक व महात्मा बसवेश्वर चौक असा होता. शहरवासीयांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी आणि रांगोळीने स्वागत करून देशभक्तीच्या वातावरणात भर घातली.
पथसंचलनानंतर ग्रँड विश्वनाथ मंगल कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. येथे नागरिक, मातृशक्ती आणि बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर संघचालक शंकर खारवाल होते, तर खंड संघचालक मंगेश शेटे आणि जिल्हा कार्यवाह सचिन देशमुख उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शस्त्रपूजन विधी पार पडला. त्यानंतर स्वयंसेवकांनी विविध प्रात्यक्षिके सादर करून संघशिस्त व संघकार्याचे दर्शन घडवले.प्रमुख अतिथी शंतनु मापारी यांनी आपल्या मनोगतात संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त समाजातील योगदान अधोरेखित करताना म्हटले की,
“संघ समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र आणतो आणि राष्ट्रहितासाठी कार्य करणारे कार्यकर्ते घडवतो. समाजाने संघाकडे समजून घेऊन पाहावे.”मुख्य वक्ते गजानन वायचळ यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात संघाची कार्यपद्धती, स्थापनेचा उद्देश आणि संघाच्या माध्यमातून समाजात होणारे सकारात्मक परिवर्तन यावर सविस्तर भाष्य केले. “संघाचे मुख्य ध्येय म्हणजे सुजाण आणि जबाबदार नागरिक घडवणे. देशप्रेम, शिस्त आणि संघभावना हीच संघाच्या कार्याची मूलभूत तत्त्वे आहेत,” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनातील संघाचे योगदान तसेच स्वातंत्र्योत्तर काळातील विविध संकटकाळात संघाने केलेल्या सेवाभावी कार्याची उदाहरणे दिली. “संघावर टीका करणाऱ्यांनी बाहेरून टीका न करता एकदा तरी शाखेत यावे, संघ जाणून घ्यावे आणि त्यानंतरच मतप्रदर्शन करावे,” असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर संघचालक शंकर खारवाल यांनी केले, तर आभार प्रदर्शन मंगेश शेटे यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन जिल्हा कार्यवाह सचिन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

