Matang community : सामाजिक, राजकीय, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात मातंग समाजावर होत असलेल्या अन्याय-अत्याचारांच्या निषेधार्थ तसेच प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने २ फेब्रुवारी रोजी लोणार शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाद्वारे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले.

तहसीलदारांच्या माध्यमातून मुखमंत्र्यांना दिले निवेदन
रहेमान नवरंगाबादी
लोणार : सामाजिक, राजकीय, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात मातंग समाजावर होत असलेल्या अन्याय-अत्याचारांच्या निषेधार्थ तसेच प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने २ फेब्रुवारी रोजी लोणार शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाद्वारे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात संविधानिक हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करावी व समाजावर होणारे अन्याय तात्काळ थांबवावेत, अशी ठाम मागणी करण्यात आली. अनुसूचित जातींसाठी असलेल्या १३ टक्के आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या १ ऑगस्ट २०२४ रोजी दिलेल्या निर्णयानुसार न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या समितीचा अहवाल स्वीकारून आरक्षणाचे उपवर्गीकरण तातडीने लागू करावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल गुन्हे जलदगती न्यायालयात चालवून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारशी तात्काळ अमलात आणाव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
याशिवाय साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा, डॉ. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळास १,००० कोटी रुपयांचे भागभांडवल देऊन महामंडळ तात्काळ सुरू करावे, लोणार तालुक्यातील कमळजा माता मंदिर (सरोवर) येथील पाणी काढण्यासाठी तातडीची उपाययोजना करावी, लातूर जिल्ह्यातील जवाहर विद्यालयातील कु. स्व. आनुष्का किरण पाटोळे मृत्यू प्रकरणाची एसआयटी व सीआयडी चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, गायरान व अतिक्रमण जमिनीधारकांना भाडेपट्टे देऊन जमिनी त्यांच्या नावावर कराव्यात, मालेगाव तालुक्यातील खाखुडर्डी येथील मातंग तरुण दीपक पानपाटील प्रकरणाचा सखोल तपास करावा, तसेच १ ऑगस्ट रोजी डॉ. अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशा एकूण ११ मागण्या मांडण्यात आल्या.
या मोर्चात समाधान साठे, गजानन अंभोरे, कीर्तीकुमार कांबळे, श्रीकृष्ण बाजड, अनिल कांबळे, किशोर बाजड, शेषराव बावरे, कैलास साठे, संतोष बाजड, दत्तात्रय रनबावरे आदींसह लोणार तालुक्यातील हजारो समाजबांधव व भगिनी सहभागी झाले होते.
मोर्चाला लोणारचे नगराध्यक्ष भूषण मापारी, जिल्हा सरचिटणीस राजेश मापारी, संघपाल पन्हाड, अश्विनी वाघ, विलास लहाने, प्रकाश धुमाळ, शेख समद, विकास मोरे यांनी जाहीर पाठिंबा दिला. मोर्चाच्या शेवटी साहेबराव पाटोळे यांनी आभार मानले.

