Mahadev idol : शहरातील आदर्श कॉलनी येथे गुरुवार, दि. ६ फेब्रुवारी रोजी श्री विश्वेश्वर महादेव मंदिर उभारणी व महादेव मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. वैदिक मंत्रोच्चार, अभिषेक, आरती आणि विविध धार्मिक विधींमुळे परिसर “हर हर महादेव”च्या जयघोषाने दुमदुमून गेला.

आमदार मनोज कायंदे यांची उपस्थिती, धार्मिक-सांस्कृतिक उपक्रमाला चालना
देऊळगाव राजा : शहरातील आदर्श कॉलनी येथे गुरुवार, दि. ६ फेब्रुवारी रोजी श्री विश्वेश्वर महादेव मंदिर उभारणी व महादेव मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. वैदिक मंत्रोच्चार, अभिषेक, आरती आणि विविध धार्मिक विधींमुळे परिसर “हर हर महादेव”च्या जयघोषाने दुमदुमून गेला.
स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने साकारलेल्या या मंदिर उभारणी उपक्रमांतर्गत सकाळपासून पूजाअर्चा, रुद्राभिषेक आणि विशेष धार्मिक विधी पार पडले. प्राणप्रतिष्ठेनंतर भाविकांनी श्री विश्वेश्वर महादेवांचे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केला. यावेळी सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
शांतता, सद्भावना आणि आध्यात्मिक ऊर्जा यांचा अनुभव देणारा हा सोहळा आदर्श कॉलनीसाठी स्मरणीय ठरला. नव्या मंदिरामुळे परिसरातील धार्मिक व सांस्कृतिक जीवनाला नवी दिशा मिळून भाविकांसाठी नित्य पूजाअर्चेचे केंद्र उपलब्ध होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
दरम्यान, या सोहळ्याला आमदार मनोज कायंदे यांनी भेट देत भाविकांना शुभेच्छा दिल्या. धार्मिक-सामाजिक उपक्रमांमुळे समाजात ऐक्य व संस्कारांची जपणूक होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

