Teacher sent to prison :पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नवेगाव गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पाच विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला अकोला न्यायालयाने कारागृहात रवानगीचे आदेश दिले आहेत.
संतप्त गावकऱ्यांचा इशारा — “हकालपट्टी करा, अन्यथा शाळेला कुलूप!”
दिग्रस बु. : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नवेगाव गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पाच विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला अकोला न्यायालयाने कारागृहात रवानगीचे आदेश दिले आहेत.
११ नोव्हेंबर रोजी ही घटना उघडकीस आल्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी त्या शिक्षकाला शाळेच्या आवारातच चांगलाच चोप दिला होता. नंतर संतप्त नातेवाईकांनी थेट चान्नी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली.
प्राथमिक माहितीनुसार, आरोपी शिक्षक सुधाकर जानकीराम पांडे यांनी सुमारे सहा दिवसांपूर्वी शाळेत शिकणाऱ्या पाच अल्पवयीन विद्यार्थिनींचा वाईट उद्देशाने विनयभंग केल्याचा आरोप आहे. या घटनेची माहिती पीडित मुलींनी आपल्या आईंना दिल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
चान्नी पोलिसांनी फिर्यादीचे जबाब नोंदवून पोस्को कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला तत्काळ अटक केली. आरोपीला १२ नोव्हेंबर रोजी अकोला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने कारागृहात रवानगीचे आदेश दिले.
या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, संतप्त ग्रामस्थांनी संबंधित शिक्षकाची जिल्हा परिषद सेवेतून तात्काळ हकालपट्टी न केल्यास शाळेला कुलूप लावण्याचा इशारा दिला आहे.


