Suryakumar Yadav to captain : आगामी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ तसेच त्याआधी न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. संघाच्या नेतृत्वाची धुरा सूर्यकुमार यादव यांच्याकडे सोपवण्यात आली असून, अक्षर पटेल यांची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारताचा १५ सदस्यीय संघ जाहीर
मुंबई : आगामी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ तसेच त्याआधी न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. संघाच्या नेतृत्वाची धुरा सूर्यकुमार यादव यांच्याकडे सोपवण्यात आली असून, अक्षर पटेल यांची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
या संघात ईशान किशन आणि रिंकू सिंग यांचा समावेश करण्यात आला असून, त्यामुळे शुभमन गिल आणि जितेश शर्मा यांना संघाबाहेर राहावे लागले आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया, मुख्य निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी शनिवारी (दि. २० डिसेंबर) मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात संघाची अधिकृत घोषणा केली.
टी-२० विश्वचषकाच्या तयारीसाठी भारत न्यूझीलंडविरुद्ध तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामने खेळणार आहे. टी-२० मालिका २१ ते ३१ जानेवारीदरम्यान होणार असून, एकदिवसीय मालिकेसाठीचा संघ नंतर जाहीर करण्यात येणार आहे.
इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेपर्यंत अक्षर पटेल उपकर्णधार होता. त्यानंतर ही जबाबदारी शुभमन गिलकडे सोपवण्यात आली होती. मात्र, दुखापतीमुळे गिलला अलीकडील सामने खेळता आले नाहीत. शिवाय, चालू वर्षातील टी-२० कामगिरी अपेक्षेप्रमाणे न ठरल्याने त्याला संघातून वगळण्यात आल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, ईशान किशनने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत झारखंड संघाचे नेतृत्व करत उल्लेखनीय कामगिरी केली. त्याने १० डावांत ५१७ धावा केल्या असून, अंतिम सामन्यात शतक झळकावले होते. या दमदार कामगिरीच्या जोरावर त्याला पुन्हा राष्ट्रीय संघात स्थान मिळाले आहे.
फलंदाजी विभागात सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग आणि ईशान किशन अशी आक्रमक फळी उभी राहिली आहे. तर हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर हे संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू असतील.
गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराह सांभाळणार असून, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा हे वेगवान गोलंदाजीचा मारा करतील. फिरकी विभागात वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांचा समावेश करण्यात आला आहे.
भारतीय संघ (टी-२०):
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, ईशान किशन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, रिंकू सिंग.

