Shelgaon to Dongaon road : डोणगाव ते विश्वी–कनका–शेलगाव देशमुख या मार्गावरील सात किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला असून गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावरून जाणाऱ्या एसटी बस सेवा वारंवार ठप्प पडत आहेत. यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे हाल वाढले असून पालकांमध्येही सततची चिंता दिसून येत आहे.

विद्यार्थ्यांसह प्रवाशी झाले त्रस्त; रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी
डोणगाव : डोणगाव ते विश्वी–कनका–शेलगाव देशमुख या मार्गावरील सात किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला असून गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावरून जाणाऱ्या एसटी बस सेवा वारंवार ठप्प पडत आहेत. यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे हाल वाढले असून पालकांमध्येही सततची चिंता दिसून येत आहे.
या मार्गावरील बससेवा खड्ड्यांमुळे अक्षरशः कोलमडली आहे. गेल्या बुधवारी बाजारदिनी बस बंद पडल्याने बेलगावकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रात्रीपर्यंत डोणगाव बसस्थानकावर थांबावे लागले. त्यानंतरच्या बुधवारीही बस बंद पडल्याने विद्यार्थ्यांना दुसऱ्या वाहनांतून घर गाठावे लागले. आणि २१ नोव्हेंबरलाही तोच प्रकार घडला — शेलगाव देशमुख बसस्थानकावर बसचा टायर पंचर होऊन सेवा ठप्प. दररोजच्या या दगदगीमुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण वाढत असून, परतीच्या प्रवासाची काळजी पालकांना सतावत आहे.
रस्त्याची दयनीय अवस्था; बस फेऱ्या रद्द
शेलगाव देशमुख–डोणगाव हा संपूर्ण मार्ग खड्ड्यांनी भरून गेल्याने एसटी बसेसचे नुकसान वाढले आहे. २१ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता डोणगाव–शेलगाव मार्गावर येणारी बस शेलगाव बसस्थानकावर थांबली आणि खराब रस्त्यामुळे टायर पंचर होऊन बस बंद पडली.त्यामुळे आरेगाव व मादणी या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या, ज्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांवर झाला.

