Balapur Municipal Council: राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा केल्यानंतर बाळापूर शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुकांची चुरस वाढली असून सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचे मनसुबे बांधले आहेत. तर स्थानिक पातळीवरील पदाधिकारी आघाडी किंवा पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा विचार करत आहेत.

इच्छुकांची झुंबड, पक्षांतर्गत नाराजी उफाळली
बाळापूर : राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा केल्यानंतर बाळापूर शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुकांची चुरस वाढली असून सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचे मनसुबे बांधले आहेत. तर स्थानिक पातळीवरील पदाधिकारी आघाडी किंवा पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा विचार करत आहेत.
शहरात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी यांसारख्या पक्षांची मोर्चेबांधणी व रणनिती ठरविण्याची बैठका सुरू असून, स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मतांचा विचार न करता काही वरिष्ठ नेते आपापल्या गोटातील उमेदवारांना संधी देत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मागील निवडणुकीत काँग्रेस वगळता इतर सर्वच पक्षांचे उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाल्याचा इतिहास असून, त्यामुळे या वेळी पक्षविरहीत निवडणुका घेण्याचा सूरही उमटत आहे.
दरम्यान, नगराध्यक्ष पद हे इतर मागास प्रवर्ग (महिला) राखीव असल्याने शहरातील उच्चशिक्षित महिलांना राजकारणात संधी मिळणार असून, त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी चुरस वाढण्याची शक्यता आहे. घराणेशाहीला आव्हान देत नवीन महिला नेतृत्व उभे राहण्याची चिन्हे दिसत आहेत.
आश्वासनांचा पाऊस , जागरूक मतदाराची कसोटी!
निवडणुका जाहीर होताच संभाव्य उमेदवार मतदारांच्या संपर्कात येऊ लागले आहेत. व्हॉट्सअॅप, सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष गाठीभेटीतून विकासकामे, मुलभूत सुविधा आणि जनअडचणी दूर करण्याच्या ग्वाही दिल्या जात आहेत. मात्र मतदार आता जागरूक असून, “फक्त निवडणुकीच्या काळात दिसणाऱ्यांपेक्षा जनतेत सातत्याने कार्य करणाऱ्यांनाच साथ” अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
तिकीट वाटपात चढाओढ — शंभराहून अधिक इच्छुकांची गर्दी
शहरातील २५ नगरसेवक पदांसह नगराध्यक्ष पदासाठी शंभराहून अधिक इच्छुकांची गर्दी दिसत आहे. स्थानिक पातळीवरील दोन्ही आघाड्यांवरही इच्छुकांची रांग असून, मात्र पक्षचिन्हावर लढण्याचा ओढा कमी दिसतो. त्यामुळे या वेळी पॅनल-आधारित निवडणूक रंगतदार होणार आहे.
गतवेळचे राजकीय समीकरण
मागील आठ वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावर लढत नगराध्यक्ष आणि १६ नगरसेवक निवडून आणले होते. भाजपने काही ठिकाणी उमेदवार उभे केले होते, तर वंचित–एमआयएम आघाडीची अनामत रक्कम जप्त झाली होती. परिवर्तन पॅनलचे उमेदवार अल्प मतांनी पराभूत झाले होते.

