crop competition announced : जिल्ह्यातील पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकरी विविध प्रयोग करत असतात. त्यांच्या या प्रयोगशील वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने रब्बी हंगाम 2025 साठी अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांची पिकस्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज दाखल करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एम. डी. ढगे यांनी केले आहे.

बुलढाणा : जिल्ह्यातील पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकरी विविध प्रयोग करत असतात. त्यांच्या या प्रयोगशील वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने रब्बी हंगाम 2025 साठी अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांची पिकस्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज दाखल करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.
प्रयोगशील शेतीला चालना मिळावी आणि इतर शेतकऱ्यांनाही त्यातून मार्गदर्शन मिळावे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. शासन निर्णय (दि. 20 जुलै 2023) नुसार बुलढाणा जिल्ह्यात ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस या पाच पिकांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेसाठी पात्रता
-
शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणे आणि ती स्वतः कसणे आवश्यक.
-
एकाच शेतकऱ्याला एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत भाग घेता येणार.
-
किमान अर्धा हेक्टर (40 आर) क्षेत्रावर त्या पिकाची सलग लागवड आवश्यक.
-
सर्व अर्जदार शेतकरी स्पर्धेसाठी पात्र मानले जातील.
-
राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या शेतकऱ्याला पुढील पाच वर्षे त्याच पिकाच्या स्पर्धेत भाग घेता येणार नाही.
प्रवेश शुल्क
-
सर्वसाधारण गट : 300 रुपये (प्रत्येक पिकानुसार)
-
आदिवासी गट : 150 रुपये
अर्जासोबत सातबारा, 8अ उतारा, चलन आणि (आदिवासी असल्यास) जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक. अर्ज संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावेत.
बक्षिसांचे स्वरूप
तालुका स्तर :
-
प्रथम : 5,000 रु.
-
द्वितीय : 3,000 रु.
-
तृतीय : 2,000 रु.
जिल्हा स्तर :
-
प्रथम : 10,000 रु.
-
द्वितीय : 7,000 रु.
-
तृतीय : 5,000 रु.
राज्य स्तर :
-
प्रथम : 50,000 रु.
-
द्वितीय : 40,000 रु.
-
तृतीय : 30,000 रु.
स्पर्धेत ज्या क्रमांकाचे बक्षीस मिळेल, त्या क्रमांकाच्या खालच्या स्तरावर पुढील पाच वर्षे सहभाग मान्य होणार नाही. मात्र उच्च स्तरावर स्पर्धेत पुन्हा सहभाग घेता येईल.
शेतकऱ्यांना आवाहन
रब्बी हंगामातील ठरवलेल्या पिकांची क्षेत्रफळे व उत्पादन वाढीसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिकस्पर्धेत सहभागी व्हावे, असे कृषि विभागाने आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाचे तंत्र अधिकारी अजय वाढे यांनी दिली.

