one crore for cabin repairs :महानगरपालिकेच्या ३० मार्च रोजी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेल्या खुल्या नाट्यगृहाच्या विकासासाठी केवळ ५ लाखांची अत्यल्प तरतूद करण्यात आली, तर दुसरीकडे स्वतःच्या केबिन दुरुस्तीसाठी तब्बल १ कोटी रुपयांची तरतूद ठेवण्यात आली आहे. हा निर्णय म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाचा सरळ अपमान आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या नगर सेवकांनी केला आहे.

हा तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुल्या नाट्यगृहाचा अवमान, वंचितच्या नगर सेवकांचा आरोप
अकोला : महानगरपालिकेच्या ३० मार्च रोजी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेल्या खुल्या नाट्यगृहाच्या विकासासाठी केवळ ५ लाखांची अत्यल्प तरतूद करण्यात आली, तर दुसरीकडे स्वतःच्या केबिन दुरुस्तीसाठी तब्बल १ कोटी रुपयांची तरतूद ठेवण्यात आली आहे. हा निर्णय म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाचा सरळ अपमान आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या नगर सेवकांनी केला आहे.
वंचितच्या नगर सेवकांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, गेल्या २५ वर्षांपासून महानगरपालिकेत सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाने या नाट्यगृहाच्या विकासासाठी नेमके काय केले, हा मूलभूत प्रश्न आजही अनुत्तरित आहे. अपवादात्मक काही वर्षे वगळता, उर्वरित २० वर्षांत ठोस विकासकामांची कोणतीही स्पष्ट आकडेवारी सत्ताधाऱ्यांकडून सादर करण्यात आलेली नाही. याउलट, वंचित बहुजन आघाडीच्या महापौर कार्यकाळात ५० लाख रुपये खर्च करून या नाट्यगृहाची दुरुस्ती करण्यात आली होती. यावरून सत्ताधाऱ्यांची उदासीनता आणि केवळ दिखावूपणा स्पष्टपणे दिसून येतो.
दलीत वस्ती निधी कायद्याने खर्च करणे बंधनकारक असल्यामुळे त्या भागात काही कामे केली जातात, मात्र स्वतःहून पुढाकार घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेल्या या महत्त्वपूर्ण सांस्कृतिक स्थळाच्या विकासासाठी कोणतीही ठोस भूमिका घेतली गेली नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे. याप्रकरणी प्रश्न उपस्थित केल्यावर विषयांतर करणे, तसेच विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना निलंबित करणे, ही लोकशाहीला बाधा आणणारी आणि दडपशाहीची भूमिका असल्याचे स्पष्ट होते. जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
म्हणूनच, गेल्या २५ वर्षांतील सविस्तर आकडेवारीसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुल्या नाट्यगृहाच्या विकासासाठी नेमकी कोणती कामे करण्यात आली, याचे स्पष्ट, पारदर्शक आणि लेखी उत्तर सत्ताधाऱ्यांनी तात्काळ द्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे गटनेते निलेश देव, पराग गवई, शेख शमशु शेख साबीर, सौ. उज्वला पातोडे, जयश्री बहादुरकर, सुनील इन्नाणी व इतर नगरसेवकांनी केली आहे.

