Political battle : व्याळा–कान्हेरी (गवळी) जिल्हा परिषद सर्कलमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. मागील निवडणुकीत अनुसूचित जाती (महिला) आरक्षित असलेल्या या सर्कलवर शिवसेना (उबाठा गट) ने विजय मिळवला होता, तर परंपरेने या सर्कलवर काँग्रेसचा प्रभाव राहिला आहे. या सर्कलमधून जिल्हा परिषदेतील कृषी सभापती पदही काँग्रेसला मिळाले होते. मात्र, या वेळी भाजपने ‘परिवर्तनाचा नारा’ देत जोरदार तयारी सुरू केली आहे.

शिवसेना ‘उबाठा गट’, भाजप आणि वंचित आमनेसामने
बाळापूर : व्याळा–कान्हेरी (गवळी) जिल्हा परिषद सर्कलमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. मागील निवडणुकीत अनुसूचित जाती (महिला) आरक्षित असलेल्या या सर्कलवर शिवसेना (उबाठा गट) ने विजय मिळवला होता, तर परंपरेने या सर्कलवर काँग्रेसचा प्रभाव राहिला आहे. या सर्कलमधून जिल्हा परिषदेतील कृषी सभापती पदही काँग्रेसला मिळाले होते. मात्र, या वेळी भाजपने ‘परिवर्तनाचा नारा’ देत जोरदार तयारी सुरू केली आहे.
व्याळा–कान्हेरी सर्कलमध्ये व्याळा आणि कान्हेरी हे दोन पंचायत समिती गण आहेत. गेल्या निवडणुकीत जि.प. सदस्यपद शिवसेना (उबाठा गट) कडे गेले, तर पं.स. सदस्यपदे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी जिंकली होती. या भागात ठोस जातीय समीकरण नसले तरी मराठा आणि माळी समाजाचे वर्चस्व लक्षणीय आहे.
गेल्या काही वर्षांत काँग्रेसची पक्षसंघटना कमकुवत झाली असून, महाविकास आघाडीत भागीदारीनंतर काँग्रेसची पकड सैल झाली आहे. त्यामुळे या वेळीही या सर्कलवर शिवसेना (उबाठा गट) आघाडी घेण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
विकासकामांपासून सर्कल वंचित
राष्ट्रीय महामार्गावर वसलेला व्याळा–कान्हेरी सर्कल विकासकामांच्या बाबतीत मागे राहिला आहे. जिल्हा परिषदेत सत्ताधारी गटाच्या विरोधात सदस्य असल्याने पाणी, वीज, रस्ते, पांदणवाटा अशा अनेक समस्या कायम आहेत. या प्रश्नांवर आगामी निवडणुकीत उमेदवारांना जनतेच्या रोषाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
राजकीय समीकरणे गुंतागुंतीची
या भागात विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांना जवळपास समान मतविभागणी मिळाल्याचे चित्र आहे. त्यामुळे व्याळा–कान्हेरी सर्कलमध्ये तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. महाआघाडीच्या वतीने हे सर्कल शिवसेना (उबाठा गट) ला, तर महायुतीतून भाजपला मिळण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडी देखील या सर्कलमध्ये आपली उपस्थिती ठळक करण्याच्या तयारीत आहे.
संभाव्य उमेदवारांची चर्चा जोरात
-
शिवसेना (उबाठा गट) – निलेश पंढरीशेठ हाडोळे (व्याळा)
-
भाजप – विलास पोटे (रिधोरा), विपुल घोगरे (नांदखेड), संजय पेठकर (मानकी), उज्वल ढाकरे (व्याळा)
-
वंचित बहुजन आघाडी – गजानन दांदळे (पारस)
-
स्थानिक पातळीवर – अजय करणकार हेही शर्यतीत असल्याचे सांगितले जात आहे.
राजकीय पक्षांकडून स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न सुरू असला तरी, वेळेअभावी बाहेरील उमेदवारांची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे व्याळा–कान्हेरी जिल्हा परिषद सर्कल या वेळी खरी तिरंगी चुरस पाहायला मिळण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.

