Molestation of minor student :अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग;नराधम शिक्षकास अटक
चान्नी पोलिसांची तत्पर कारवाई — वाडेगाव परिसरात संतापाची लाट
वाडेगाव : अकोला जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकाने शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपी शिक्षक सुधाकर पांडे यास चान्नी पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घटना सहा दिवसांपूर्वी घडली. विद्यार्थिनीने घरी जाऊन आपल्या आईला या घटनेची माहिती दिल्यानंतर संतप्त पालकांनी तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा क्रमांक ३०३/२०२५ नोंदवून आरोपीस ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम ७४ तसेच पोक्सो कायद्यातील कलम ८, १० आणि १२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीस अटक करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय घुगे आणि सुधाकर करवते हे ठाणेदार रविंद्र लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळा परिसरात सुरक्षाव्यवस्था मजबूत करण्याची मागणी होत आहे. “शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी आदर्श असतो; अशा प्रकरणांना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे,” अशी प्रतिक्रिया पालक आणि स्थानिक नागरिकांनी दिली.

