Missing man’s body: शहरातील रामजी नगर परिसरातील एका ४० वर्षीय इसमाचा मृतदेह शेतशिवारात आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. १ नोव्हेंबरपासून हा इसम बेपत्ता होता. पोलिस आणि नातेवाईकांनी शोध घेतला तरी तो मिळून आला नव्हता. अखेर ८ नोव्हेंबर रोजी बोरगाव मंजू शेतशिवारात त्याचा मृतदेह सापडला. मृत व्यक्तीचे नाव देविदास गुलाब खिल्लारे (वय ४०, रा. बोरगाव मंजू) असे आहे.

बोरगाव मंजू : शहरातील रामजी नगर परिसरातील एका ४० वर्षीय इसमाचा मृतदेह शेतशिवारात आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. १ नोव्हेंबरपासून हा इसम बेपत्ता होता. पोलिस आणि नातेवाईकांनी शोध घेतला तरी तो मिळून आला नव्हता. अखेर ८ नोव्हेंबर रोजी बोरगाव मंजू शेतशिवारात त्याचा मृतदेह सापडला. मृत व्यक्तीचे नाव देविदास गुलाब खिल्लारे (वय ४०, रा. बोरगाव मंजू) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देविदास खिल्लारे हे १ नोव्हेंबर रोजी घरून कुणालाही काही न सांगता बाहेर पडले होते. उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोध घेतला, मात्र काहीच सुगावा लागला नाही. अखेर नातेवाईकांनी बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
सदर तक्रारीनंतर ठाणेदार अनिल गोपाळ, हेडकॉन्स्टेबल संजय भारसाकडे व अमोल मोरे यांनी तपास सुरू केला होता. सतत शोध घेत असताना अखेर ८ नोव्हेंबर रोजी बोरगाव मंजू शेतशिवारात देविदास खिल्लारे यांचा मृतदेह आढळून आला.घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अनिल गोपाळ, हेडकॉन्स्टेबल सतीश हाडोळे आणि पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला आहे. नेमका मृत्यू कसा झाला हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून, पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. पुढील तपास ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल संजय भारसाकडे आणि अमोल मोरे करीत आहेत.

