child marriage : अल्पवयीन मुलीचा १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील टाकरखेड भागीले येथे उघडकीस आला असून, या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी मुलीचे आई-वडील, पती तसेच विवाहास सहकार्य करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे हा बालविवाह समोर आला असून घटनेमुळे परिसरात सामाजिक पातळीवरही चर्चा सुरू झाली आहे.

देऊळगाव राजा : अल्पवयीन मुलीचा १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील टाकरखेड भागीले येथे उघडकीस आला असून, या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी मुलीचे आई-वडील, पती तसेच विवाहास सहकार्य करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे हा बालविवाह समोर आला असून घटनेमुळे परिसरात सामाजिक पातळीवरही चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंदखेडराजा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा विवाह २५ एप्रिल २०२५ रोजी टाकरखेड भागीले येथे सुमित अमोल घेवंदे याच्यासोबत लावण्यात आला. मुलगी अल्पवयीन असल्याची जाणीव असूनही विवाह लावून दिल्याचा आरोप संबंधितांवर आहे. या प्रकरणी मुलीचे पालक तसेच अमोल घेवंदे, संगिता अमोल घेवंदे आणि सुमित अमोल घेवंदे (रा. वाघत वाघुळ, ता. सिंदखेडराजा) यांच्याविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही बाब ६ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री उघडकीस आली असून ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.२८ वाजता देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. संबंधित गुन्हा चिखली पोलीस ठाण्याकडून वर्ग करून देऊळगाव राजा येथे दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक क्रांती ढाकणे करीत आहेत. बालविवाह ही सामाजिकदृष्ट्या गंभीर समस्या असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासन सतर्क असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तसेच बालविवाह रोखण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.

