Leopard’s movement: अकोला वनविभागांतर्गत येणाऱ्या तामसी शिवारातील वघाळी नाल्याजवळ सायंकाळी अंदाजे ७ वाजता बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाडेगाव : अकोला वनविभागांतर्गत येणाऱ्या तामसी शिवारातील वघाळी नाल्याजवळ सायंकाळी अंदाजे ७ वाजता बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तामसी येथील अनिल बाहे व त्यांचे मित्र म्हात्रे हे वाडेगाववरून चारचाकी वाहनाने तामसीकडे जात असताना वघाळी परिसरात पाण्याच्या डबक्यात पाणी पिऊन रस्ता ओलांडणारा बिबट्या त्यांच्या नजरेस पडला.
शक्य तितक्या सुरक्षित अंतरावरून त्यांनी लाईटच्या उजेडात मोबाईलद्वारे त्याचा व्हिडिओ तयार करून गावकऱ्यांना सावध केले.
दरम्यान, सध्या रब्बी हंगाम सुरू असून शेतकऱ्यांची शेतात मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढली आहे. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
स्थानिक शेतकरी वर्गाने वनविभागाला तातडीने बिबट्याला पकडून सुरक्षित ठिकाणी हलवण्याची मागणी केली आहे.
वन विभागाने या प्रकरणी तातडीने लक्ष घालावे, अशी सर्वस्तरातून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

