World Day of Persons with Disabilities: रवर्षीप्रमाणे यंदाही अकोला येथे महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी/अधिकारी संघटना, जिल्हा शाखा अकोला यांच्या वतीने दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी जागतिक दिव्यांग दिनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहावे, समितीचे आवाहन
राहुल सोनोने
वाडेगाव : दरवर्षीप्रमाणे यंदाही अकोला येथे महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी/अधिकारी संघटना, जिल्हा शाखा अकोला यांच्या वतीने दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी जागतिक दिव्यांग दिनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
१ ते ३ डिसेंबर २०२५ या तीन दिवसांदरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मुख्य कार्यक्रम ३ डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. या निमित्ताने ३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता संघटनेच्या कार्यालयापासून (हेड पोस्ट ऑफिसजवळ) शहरातून भव्य दिव्यांग रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीला अकोला जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी वर्षा मीना (भा.प्र.से.) हिरवी झेंडी दाखवणार आहेत.
रॅलीचा समारोप झाल्यानंतर मनपा हिंदी शाळा क्र. ४, चिवचिव बाजार, अकोला येथे मुख्य समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संघटनेचे विभागीय अध्यक्ष संजय बरडे स्वीकारणार असून प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ. सुनिल लहाने (आयुक्त, मनपा अकोला), रोशनी बन्सल (सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण), दिगंबर लोखंडे (अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. अकोला), डॉ. तुषार जाधव (दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, जि.प. अकोला), मा. दिलीप जाधव (उपायुक्त, मनपा अकोला), मा. रतनसिंग पवार (शिक्षणाधिकारी, प्रा. जि.प. अकोला) तसेच दिनकरराव काळे (राज्य संचालक व विदर्भ निरीक्षक, म.रा. अपंग कर्मचारी संघटना, मुंबई) उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून जिल्हा काँग्रेस सेलचे सचिन शेजव आणि जिल्हा भाजप सेलचे बाळासाहेब नेरकर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा सपत्निक सत्कार करण्यात येणार असून संघटनेचे कोषाध्यक्ष दिलीप सरदार आणि माध्यमिक शिक्षक जिल्हाध्यक्ष जावेद इक्बाल यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग पाल्य, गुणवंत विद्यार्थी आणि खेळाडू यांचा देखील सन्मान केला जाणार आहे.दुसऱ्या सत्रात दिव्यांगांसाठी स्वयंरोजगार व कौशल्य विकासाच्या संधी या विषयावर जिल्हा कौशल्य विकास, स्वयंरोजगार अधिकारी प्रफुल्ल शेळके मार्गदर्शन करणार आहेत. दिव्यांग महिला व बालिकांसाठी शासनाच्या विविध योजनांबाबत गिरीश पुसदकर (जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी, अकोला) माहिती देणार आहेत. तसेच जिल्हा प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी हे लघुउद्योग व स्वयंरोजगार योजनांबाबत मार्गदर्शन करतील.
अंतिम सत्रात दिव्यांग वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यापूर्वी २ डिसेंबर रोजी अपंग हक्क व भागीदारी कायदा १९९५ तसेच दिव्यांग हक्क व समानसंधी अधिनियम २०१६ याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच नवोदित कवींच्या कवी संमेलनाचेही आयोजन करण्यात आले आहे.
३ दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमांसाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त मनपा आणि अन्य विभाग प्रमुखांनी दिव्यांग कर्मचारी यांना विशेष रजा मंजूर केली आहे.यावेळी दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष संजय बरडे, सचिव मो. अजीज, कोषाध्यक्ष दिलीप सरदार, प्रवीण फुले, सुनील वानखडे, सुधीर कडू, दिव्यांग बेरोजगार संघटनेचे श्रीकांत देशमुख आणि पदाधिकारी यांनी केले आहे.

