taluka level school games : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे पंचायत समितीच्या शिक्षण विभागांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये खेळ व क्रीडा यांची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांच्या अंगभूत सुप्त क्षमतांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने १६ व १७ डिसेंबर रोजी दोन दिवसीय तालुकास्तरीय शालेय खेळ व क्रीडा स्पर्धा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या थाटात आयोजित करण्यात आला आहे.

राहुल सोनोने
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे पंचायत समितीच्या शिक्षण विभागांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये खेळ व क्रीडा यांची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांच्या अंगभूत सुप्त क्षमतांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने १६ व १७ डिसेंबर रोजी दोन दिवसीय तालुकास्तरीय शालेय खेळ व क्रीडा स्पर्धा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या थाटात आयोजित करण्यात आला आहे.
बाळापूर तालुक्यातील पी. एम. श्री. आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद वरिष्ठ केंद्र शाळा, वाडेगाव (मुले) येथे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या तालुकास्तरीय शालेय खेळ व क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन गटविकास अधिकारी नाना पजई यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख उपस्थितीत सरपंच मंगेश तायडे, उपसरपंच राजेश्वर पळसकार, माजी उपसरपंच सुनील घाटोळ, केंद्रप्रमुख माधव काळे, मुख्याध्यापक समाधान सोर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा भाग्यश्री हिराळकर, ग्रामपंचायत सदस्य सचिन धनोकार यांच्यासह गावातील आजी-माजी पदाधिकारी व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.
शालेय खेळ व क्रीडा स्पर्धांत विविध क्रीडा प्रकारांमध्ये विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना १७ डिसेंबर रोजी पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे. हा बक्षीस वितरण सोहळा वैभव फरतारे (तहसीलदार, बाळापूर), नाना पजई (गटविकास अधिकारी, बाळापूर), दिनेश दुतंडे (गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती बाळापूर) तसेच प्रकाश झोडगे (पोलीस निरीक्षक, बाळापूर) यांच्या हस्ते पार पडणार आहे.
उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका प्रिया देशमुख व प्रणिता डंबाळे यांनी केले. कार्यक्रमास तालुक्यातील विविध शाळांमधील खेळ व क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणारे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित विद्यार्थी व मान्यवरांसाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते तसेच वाडेगावचे माजी सरपंच पुत्र गोपाल राऊत यांनी भोजनाची व्यवस्था करून दिली. त्या निमित्ताने शिक्षण विभाग, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक समाधान सोर व गजानन कातखेडे यांच्या हस्ते गोपाल राऊत यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शाळा व गावातील मुलांसाठी वेळोवेळी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन गोपाल राऊत यांनी उपस्थित मान्यवर व प्रशासनाला दिले.

