Sanjay Khadse : बुद्ध विहारातून भावी पिढी घडली पाहीजे, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले. तालुक्यातील सावंगी टेकाळे येथील विश्वशांती बुद्ध विहाराला त्यांनी भेट दिली. यावेळी ते बाेलत हाेते.

गजानन तिडके
देऊळगावराजा : बुद्ध विहारातून भावी पिढी घडली पाहीजे, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले.
तालुक्यातील सावंगी टेकाळे येथील विश्वशांती बुद्ध विहाराला त्यांनी भेट दिली. यावेळी ते बाेलत हाेते.
ते पुढे म्हणाले की, “बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे तुम्ही २०-२१ वर्षांपासून वर्षावासामध्ये पठण आणि श्रवण करता, हे पाहून मला खरोखर आनंद झाला. मोठे बौद्ध विहार तुम्ही उभारले असून त्यातील तथागतांची मूर्ती पाहून मला नतमस्तक होता आले, हे माझे भाग्य आहे. ही मूर्ती १९७१ मधील असून माझा जन्म १९७४ साली झाला, त्यामुळे मला विशेष समाधान वाटते.”
ग्रंथातील विचार मांडताना प्रा. खडसे म्हणाले की, “आपले आचरण स्वच्छ ठेवले पाहिजे. एकमेकांबद्दल द्वेष न ठेवता जीवन जगले पाहिजे. जो जन्माला आला तो मरणारच आणि दुःख भोगणारच, पण त्यातून मार्ग काढत पुढे जाणे गरजेचे आहे. रडून न बसता लढा देणे आवश्यक आहे. आपण आज जिथे आहोत ते कोणा तरीमुळे आहे, म्हणून मागे वळून पाहणेही आवश्यक आहे.” त्यांनी अंगुलीमाळ आणि तथागतांची कथा सांगून उपस्थितांची मने जिंकली.
“दरवर्षी २० वर्षांपासून तुम्ही या ग्रंथाचे वाचन व श्रवण करता, हे कौतुकास्पद आहे. परंतु जसे ग्रंथ पठण करता तसेच या बुद्ध विहारातून भावी पिढी घडवली पाहिजे. दररोज सकाळी-संध्याकाळी लहान मुलांनी येथे येऊन अभ्यास केला पाहिजे, समाजापुढे आदर्श ठेवला पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवराय, माँ जिजाऊ, तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. बुद्ध विहार स्मारक समिती व तंटामुक्ती समितीच्या वतीने उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच शिवाजी झोटे, उपसरपंच दीपक बुरकुल यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवराज झोटे यांनी केले तर आभार वामनराव झोटे (बुद्ध विहार स्मारक समिती) यांनी मानले. या कार्यक्रमास गावातील बहुसंख्य नागरिक, बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

