Final voter list published : पातूर नगरपरिषद निवडणुकीची अधिकृत घोषणा अद्याप बाकी असताना, अखेर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर २१ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. रविवारी दुपारी १२ वाजता ही यादी नगरपरिषद कार्यालयाच्या मुख्य भिंतीवर सार्वत्रिकरीत्या लावण्यात आली. यानंतर नागरिकांसह इच्छुक उमेदवारांची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मोठ्या प्रमाणात न. प .क्षेत्रातील मतदार गेले बाहेर; अगदी बाहेरील बहुतांश मतदार न. प क्षेत्रात
संजय गोतरकर
पातूर : पातूर नगरपरिषद निवडणुकीची अधिकृत घोषणा अद्याप बाकी असताना, अखेर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर २१ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. रविवारी दुपारी १२ वाजता ही यादी नगरपरिषद कार्यालयाच्या मुख्य भिंतीवर सार्वत्रिकरीत्या लावण्यात आली. यानंतर नागरिकांसह इच्छुक उमेदवारांची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचे चित्र पाहायला मिळाले.
अंतिम यादी जाहीर झाली असली तरी त्यातील त्रुट्या मात्र कायम असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. शिरला परिसरातील अनेकांची नावे यादित समाविष्ट झाल्याचे दिसते, तर शहरातील शेकडो मतदारांची नावे हद्दीबाहेर टाकण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. अधिकृत आकडा नगरपरिषदेने अद्याप जाहीर केला नसला तरी या त्रुट्यांमुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त करत आहेत.
अकोला जिल्ह्यातील इतर नगरपरिषदांप्रमाणेच निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. २ डिसेंबर रोजी मतदानाची तारीख निश्चित असताना, पातूर नगरपरिषद निवडणुकीबाबत मात्र निवडणूक आयोग किंवा शासनाने कोणतीही अधिकृत सूचना जाहीर केलेली नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांसह सर्वसामान्य नागरिकांनाही घोषणेची प्रतीक्षा करावी लागत आहे.
रविवारी मतदारयादी लागल्यानंतर विविध पक्षांचे संभाव्य उमेदवार, त्यांचे समर्थक आणि नागरिक यांनी कार्यालयात मोठी गर्दी करत यादीची पाहणी केली व प्रती खरेदी केल्या. दरम्यान, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी निवडणुकीसंदर्भातील कामात व्यस्त असल्याचेही दिसले.
पातूर नगरपरिषदेच्या दहा प्रभागांतून एकूण वीस नगरसेवक निवडले जाणार असून नगराध्यक्ष पदासाठी थेट जनतेतून निवड होणार आहे.
मतदारांचे म्हणणे स्पष्ट आहे — “संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार आम्हालाही बजावता आला पाहिजे; शासनाने तातडीने सुधारित यादी द्यावी.”

