Farmer commits suicide: कर्जाचा वाढता बोजा, सततची नापिकी आणि यावर्षीच्या ओल्या दुष्काळामुळे त्रस्त झालेल्या तुलंगा खुर्द येथील एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ही घटना चान्नी पोलिस स्टेशन हद्दीत ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली.

राहुल सोनोने
वाडेगाव : कर्जाचा वाढता बोजा, सततची नापिकी आणि यावर्षीच्या ओल्या दुष्काळामुळे त्रस्त झालेल्या तुलंगा खुर्द येथील एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ही घटना चान्नी पोलिस स्टेशन हद्दीत ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली.
मृत शेतकऱ्याचे नाव कैलास उर्कडा हातोले (वय ६५, रा. तुलंगा खुर्द) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हातोले हे कर्जाच्या विवंचनेत होते. शेतीवर असलेले बँकेचे कर्ज आणि खाजगी सावकारांचे दडपण यामुळे मानसिक तणावाखाली त्यांनी आपल्या राहत्या घराच्या मागे विष प्राशन केले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ वाडेगाव येथील दवाखान्यात दाखल केले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
हातोले यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने परिवार आर्थिक व मानसिक संकटात सापडला असून, प्रशासनाने तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

