Money Robbed : बँकेत पैसे जमा करण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्याला अडवून मारहाण करत २० हजार रुपये हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील मेव्हणा राजा येथे ९ एप्रिल रोजी घडली. आरोपीने फिर्यादीची दुचाकी पाडून तिचीही तोडफोड केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

गजानन तिडके
देऊळगाव राजा : बँकेत पैसे जमा करण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्याला अडवून मारहाण करत २० हजार रुपये हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील मेव्हणा राजा येथे ९ एप्रिल रोजी घडली. आरोपीने फिर्यादीची दुचाकी पाडून तिचीही तोडफोड केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप रमेश चाटे (वय ४५, व्यवसाय शेती, रा. मेव्हणा राजा) हे गुरुवारी (दि. ९ एप्रिल) सकाळी सुमारे १०.३० वाजता जवळील २० हजार रुपये बँकेत जमा करण्यासाठी दुचाकीवरून जात होते. त्यावेळी गावातीलच आरोपी आकाश विजय काकडे याने त्यांना रस्त्यात अडवले.
आरोपीने फिर्यादीकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र फिर्यादीने पैसे नसल्याचे सांगत नकार दिला. याच कारणावरून आरोपी संतापला आणि त्यांच्यासोबत वाद घालत दुचाकीवरून खाली पाडले. त्यानंतर शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
यावरच न थांबता आरोपीने फिर्यादीची मोटारसायकल दगडाने ठेचून सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मारहाणीमुळे खाली पडलेले पैसे फिर्यादी उचलत असताना आरोपीने ते हातातून हिसकावून घेत पळ काढला. पैसे परत मागितल्यावरही आरोपीने पुन्हा चापटांनी मारहाण केल्याचे फिर्यादीने सांगितले.
या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी आरोपीविरुध्द भारतीय न्याय संहिता कलम ११९(१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याची नोंद पोलीस हेडकॉन्स्टेबल काकड यांनी केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहोळकर करत आहेत.

