Padmavati dam : मासरूळ पद्मावती धरण येथून कालव्याद्वारे अवाजवी पाणी सोडण्यात येत असल्याने धरणातील उपयुक्त जलसाठा वेगाने घटत असून उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची भीती व्यक्त होत आहे. जवळपास २७ गावांचा पिण्याचा व सिंचनाचा पाणीपुरवठा या धरणावर अवलंबून आहे.

लघु पाटबंधारे विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह; कालव्यांच्या गळतीमुळे जलसाठ्यात घट
पंडीत सावळे
मासरूळ : मासरूळ पद्मावती धरण येथून कालव्याद्वारे अवाजवी पाणी सोडण्यात येत असल्याने धरणातील उपयुक्त जलसाठा वेगाने घटत असून उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची भीती व्यक्त होत आहे. जवळपास २७ गावांचा पिण्याचा व सिंचनाचा पाणीपुरवठा या धरणावर अवलंबून आहे.
गत तीन महिन्यांपासून कालव्याद्वारे तसेच नदी-नाल्यांच्या मार्गे अतिरिक्त विसर्ग होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. सिंचनासाठी गरजेपेक्षा जास्त कालावधी पाणी सोडणे, कालव्यांची दुरुस्ती न झाल्याने मोठ्या प्रमाणावर गळती होणे आणि पाणी आवर्तनाचे ठोस वेळापत्रक नसणे, या कारणांमुळे जलसाठा झपाट्याने कमी होत असल्याचे समोर आले आहे.
मासरूळ, धामणगाव, वरूड, जामठी, सोयगाव, तरारखेड, गुम्मी, मढ, पाडळी, देऊळघाट, चांडोळ, धाड, धावडा, पिंपळगाव, वालसावंगी, पद्मावती, पारध, अवघडराव सावंगी आदी गावांचा पाणीपुरवठा व उपसा सिंचन व्यवस्था या धरणावर अवलंबून आहे. सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा या प्रकल्पातून मिळते. मात्र कालवा नादुरुस्त असल्याने धरण भरूनही पाणी वाहून जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
“धरण उशाला आणि कोरड घशाला” अशी अवस्था झाली आहे. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे पिके संकटात सापडत असून भविष्यातील टंचाईची भीती वाढली आहे. पाणी सोडण्याचे शास्त्रीय नियोजन करावे व कालव्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.वरूड ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. शीला अमोल बुरजे यांनीही अतिरिक्त विसर्गामुळे पाणीसाठा घटल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
दरम्यान, पावसाळ्यापूर्वी कालव्यांची दुरुस्ती करून पाणी आवर्तनाचे काटेकोर नियोजन करणे अत्यावश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा उन्हाळ्यात मासरूळ-पद्मावती परिसराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
लघु पाटबंधारे विभाग चिखली येथील कनिष्ठ अभियंता महावीर मुरकुटे यांनी धरणातील पाणीसाठा कमी झाल्याची कबुली देत उपसा सिंचन कालव्याला पाणी सुटणे व बाष्पीभवन यामुळे साठ्यात लक्षणीय घट झाल्याचे सांगितले. पाणीबचतीसाठी सिंचन आवर्तनांवर कपात करण्याचे संकेतही त्यांनी दिले.
जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी बुलढाणा पेजला भेट द्या

