Chhatrapati Shivaji Maharaj : अजिसपुर येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केंद्रीय आयुष, आरोग्य, कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व संजय रायमुलकर यांच्या हस्ते झाले अनावरण
लाेणार : अजिसपुर येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केंद्रीय आयुष, आरोग्य, कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शिवरायांच्या पुतळ्याभोवती फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. फटाक्यांच्या आतिषबाजीत व ढोल ताशांच्या गजरात, छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या गगनभेदी निनादात कार्यक्रमाला प्रारंभ झाला. प्रतापराव जाधव आणि संजय रायमुलकर यांनी शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी १००८ स्वामी साध्यज्ञ चैतन्य महाराज, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी, शिवछत्र मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मापारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कारभारी सानप ,माजी सभापती संतोष मापारी ,शिव पाटील तेजनकर, युवा सेनेचे तालुका पमुख गजानन मापारी ,पिंटूभाऊ आढाव, विठ्ठलराव जाधव ,सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रल्हादराव सुलताने, पंडित बावळे, सरपंच गणेश मुकीर, ज्ञानेश्वर वाकुडकर प्रामुख्याने उपस्थित होते. शाल श्रीफळ देऊन सर्व मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मार्गदर्शन करतांना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, छत्रपती शिवरायांच्या संपूर्ण जीवन कार्यातून युवकांनी प्रेरणा घेऊन आपली प्रगती करणे ही काळाची गरज आहे. एकेकटी व्यक्ती विचार आणि प्रेरणा देऊ शकते. परंतु मोठे कार्य उभे करायचे असेल तर सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असते. अठरापगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन शिवरायांनी स्वराज्य निर्मिती केली, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. ते पुढे म्हणाले की, महायुतीच्या सरकारने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नेहमीच मदतीचा हात दिला आहे. हे सरकार अतिशय संवेदनशील आहे, कृतिशील आहे. गेल्या तीन वर्षात किती मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळाली हे शेतकऱ्यांनी आपापले बँकेचे पासबुक तपासून खात्री करून घ्यावी.
महायुती आणि मित्र पक्षांचे सरकार केंद्रात व राज्यात आहे. त्यामुळे विकासाची भरीव कामे मेहकर मतदार संघात झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात मतदार संघात पाच हजार दोनशे कोटी रुपयांचा निधी आम्ही आणला. हा विकास यज्ञ यापुढेही सुरू राहणार आहे, असे सांगून माजी आमदार संजय रायमुलकर म्हणाले की, राज्य व केंद्रातील सत्तेची परिसराच्या विकासासाठी मोठी मदत होते त्यामुळे आगामी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या स्वायत्त संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे आणि महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी प्रा. बळीराम मापारी यांच्यासह इतर वक्त्यांनी आपले विचार व्यक्त केले.

