MLA Sanjay Gaikwad: ग्रामीण भागातील समाज व्यवस्थेचे रूपांतर करण्याचे सामर्थ्य शिक्षणात आहे. ही धुरा समर्थपणे पार पाडणाऱ्या शिक्षकांनी बुलढाणा जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन आमदार संजय गायकवाड यांनी केले जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित जिल्हा शिक्षक गौरव पुरस्कार सोहळा आज गर्दे वाचनालय सभागृहात पार पडला.यावेळी ते बाेलत हाेते.

जिल्हा शिक्षक पुरस्कार विजेत्यांचा गौरव सोहळा उत्साहात
बुलढाणा : ग्रामीण भागातील समाज व्यवस्थेचे रूपांतर करण्याचे सामर्थ्य शिक्षणात आहे. ही धुरा समर्थपणे पार पाडणाऱ्या शिक्षकांनी बुलढाणा जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन आमदार संजय गायकवाड यांनी केले
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित जिल्हा शिक्षक गौरव पुरस्कार सोहळा आज गर्दे वाचनालय सभागृहात पार पडला. यावेळी ते बाेलत हाेते.
या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशीष पवार, शिवशंकर भारसाकळे, प्रमोद एंडोले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रकाश राठोड, डॉ. जगराम भटकर (प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था), समाजकल्याण अधिकारी डॉ. अनिता राठोड, शिक्षणाधिकारी विकास पाटील, अनिल आकाळ, डॉ. वैशाली ठग, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक सतीश देशमुख, कृषी विकास अधिकारी पुरुषोत्तम अनगाईत, तसेच जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख, गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.
आमदार गायकवाड म्हणाले की, शिक्षक हे समाज परिवर्तनाचे खरे वाहक आहेत. केवळ वर्गखोल्यांतील शिक्षणापुरते मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पुरस्कार हा केवळ सन्मान नसून तो एक जबाबदारीही आहे. गौरव प्राप्त शिक्षकांनी आपले ज्ञान इतर शाळांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात म्हणाले की, जिल्हा परिषद प्रशासन सर्व शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी कटिबद्ध आहे. निपुण महाराष्ट्र आणि मिशन झेड या उपक्रमांद्वारे ग्रामीण विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शाळेतील शिक्षण हे केवळ पुस्तकातील अभ्यासापुरतेच मर्यादित न राहता प्रत्येक विद्यार्थ्यांचा कलागुण आणि व्यक्तिमत्त्व विकास याकडेही प्रत्येक शिक्षकांने लक्ष दिले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या पट नोंदणी सोबतच शाळेतील उपस्थिती व गुणवत्ता या बाबींकडे प्रशासनाकडून विशेष लक्ष केंद्रित केल्या जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
७० शिक्षकांचा सपत्नीक गौरव
या समारंभात सन २०१८-१९ ते २०२४-२५ या सहा वर्षांतील ७० शिक्षकांचा सपत्नीक शाल, श्रीफळ, साडी, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात “मिशन झेड” उपक्रमात योगदान देणाऱ्या शिकवणी संस्था संचालक आणि जनजागृतीसाठी कार्य करणाऱ्या कलावंतांचा सत्कार करण्यात आला. तसेच “निपुण महाराष्ट्र” उपक्रमात संपूर्ण राज्यात बुलढाणा जिल्ह्याने तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल डॉ. जगराम भटकर, शिक्षणाधिकारी विकास पाटील, अनिल आकाळ आणि डॉ. वैशाली ठग यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन अरविंद शिंगाडे यांनी तर आभार प्रदर्शन उपशिक्षणाधिकारी अनिल देवकर यांनी केले. गौरव प्राप्त शिक्षकांनी प्रशासन आणि शिक्षण विभागाचे आभार मानत आपल्या भावना व्यक्त केल्या.

