Dr. Rajendra Shingne : बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर नागपूरहून पुण्याकडे जाणारी एक भरधाव कार सिंदखेडराजा तालुक्यातील चॅनल क्रमांक ३३८.२ जवळ अचानक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला जोरदार आदळली. या भीषण अपघातात कारमधील तिघी महिला गंभीर जखमी झाल्या. विशेष म्हणजे या वाहनाची चालकही महिला होती.या अपघातात जखमी झालेल्यांसाठी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे देवदुतच ठरले. त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे तीन जखमी महिलांचे प्राण वाचले.

सिंदखेडराजा नजीक भरधाव कारचा भीषण अपघात; डॉ. शिंगणे यांच्या तत्पर वैद्यकीय मदतीमुळे तीन महिलांचे वाचले प्राण
गजानन भालेकर
धोत्रा नंदाई : बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर नागपूरहून पुण्याकडे जाणारी एक भरधाव कार सिंदखेडराजा तालुक्यातील चॅनल क्रमांक ३३८.२ जवळ अचानक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला जोरदार आदळली. या भीषण अपघातात कारमधील तिघी महिला गंभीर जखमी झाल्या. विशेष म्हणजे या वाहनाची चालकही महिला होती.या अपघातात जखमी झालेल्यांसाठी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे देवदुतच ठरले. त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे तीन जखमी महिलांचे प्राण वाचले.
महामार्गावर नागपूरहून पुण्याकडे जाणारी एक भरधाव कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला जोरदार आदळली. अपघात इतका भीषण होता की काही काळ महामार्गावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली. याच दरम्यान अपघातग्रस्त वाहनाच्या मागून येत असलेली सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तसेच माजी आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची गाडी घटनास्थळी पोहोचली. परिस्थितीची गंभीरता लक्षात येताच त्यांनी तात्काळ स्वतःची गाडी थांबवून अपघातस्थळी धाव घेतली.
डॉ. शिंगणे यांनी प्रथम जखमी महिलांची प्रकृती तपासली व त्यांना मानसिक धीर दिला. डॉक्टर असल्यामुळे त्यांनी आपल्या वैद्यकीय अनुभवाचा वापर करत कोणती जखम गंभीर आहे आणि कोणाला तातडीच्या उपचारांची गरज आहे, याचे योग्य मूल्यांकन केले. घाबरलेल्या महिलांना शांत करत त्यांनी प्राथमिक स्वरूपाची आवश्यक वैद्यकीय मदत केली.यानंतर डॉ. शिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली अपघातग्रस्त महिलांना तातडीने जालना येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे तिघीही महिलांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांचे प्राण वाचल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.
लोकप्रतिनिधी असूनही केवळ औपचारिक मदत न करता स्वतः डॉक्टर म्हणून जबाबदारी स्वीकारत डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दाखवलेली तत्परता व माणुसकी सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. संकटाच्या प्रसंगी त्यांनी खऱ्या अर्थाने “देवदूत” बनून मदत केल्याने परिसरातील नागरिकांनी व प्रवाशांनी त्यांचे मनापासून कौतुक केले आहे.

