Chief Minister Fadnavis: “शहरीकरणाला कधीही अभिशाप समजू नका. शहरं हीच रोजगारनिर्मितीची मोठी केंद्रं आहेत. महाराष्ट्रातील सुमारे 6.6 कोटी जनता चिखलीसारख्या सुमारे 400 शहरांमध्ये राहते. त्यामुळे शहरांचा विकास हा राज्य आणि देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे,” असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

चिखली : “शहरीकरणाला कधीही अभिशाप समजू नका. शहरं हीच रोजगारनिर्मितीची मोठी केंद्रं आहेत. महाराष्ट्रातील सुमारे 6.6 कोटी जनता चिखलीसारख्या सुमारे 400 शहरांमध्ये राहते. त्यामुळे शहरांचा विकास हा राज्य आणि देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे,” असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सार्वत्रिक नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचारार्थ ते मंगळवार, २५ नोव्हेंबर रोजी विदर्भ दौऱ्यावर होते. दुपारी तीन वाजताच्या सुमारास त्यांनी चिखली येथील जाहीर सभेत नागरिकांना संबोधित केले.
सभा सुरू करताना त्यांनी “चिखली शहराच्या ग्रामदैवत आई रेणुका मातेचे आशीर्वाद घेतो” असे म्हणत भाषणाची सुरुवात केली. “मी इथे कुणावर टीका करण्यासाठी नाही, तर विकासावर बोलण्यासाठी आलो आहे,” असे सांगत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विकासात्मक धोरणांवर प्रकाश टाकला.
‘अमृत’ योजनेमुळे शहरी भागाला चालना — मुख्यमंत्री
फडणवीस म्हणाले, “केंद्र सरकारने सुरुवातीपासूनच शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस निर्णय घेतले आहेत. विशेषतः ‘अमृत’ योजनेमुळे शहरी भागात मूलभूत सोयीसुविधा उभारण्यासाठी वेग आला आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, आमदार आणि नगरपालिका – या चौघांचे एकत्रित नेतृत्व मिळाले तर शहराचा विकास वेगाने होईल.”
‘भ्रष्टाचाराला भाजपमध्ये शून्य सहनशीलता’
सभा पुढे नेताना त्यांनी ठामपणे सांगितले,“भारतीय जनता पक्ष भ्रष्टाचाराला कधीही आश्रय देत नाही. स्वतःच्या नगराध्यक्षानेही चुकी केली, तरी त्याला पदावरून हटवण्याचे धैर्य फक्त भाजपमध्येच आहे.”
शिवरायांचा अश्वारूढ पुतळा चिखलीत उभारणार
चिखली शहरात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याबद्दलही त्यांनी बोलताना, “हा पुतळा चिखलीकरांसाठी अभिमानाचे प्रतीक ठरेल,” असे सांगितले.त्याचबरोबर, शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक ओळखीला बळ मिळण्यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे उभारण्याची घोषणा देखील या सभेत करण्यात आली.

