Bus service : पातूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात आणि अकोला–वाशीम जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या पिंपरडोळी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बससेवा बंद आहे. यामुळे ग्रामस्थ आणि प्रवासी यांना प्रचंड गैरसोय होत असून, बससेवा पुन्हा सुरू करण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन अकोला व वाशीम येथील परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

अनेक निवेदने देउनही दखल नाही, ग्रामस्थांचा आंदाेलनाचा इशारा
राहुल सोनोने
दिग्रस (बु.): पातूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात आणि अकोला–वाशीम जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या पिंपरडोळी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बससेवा बंद आहे. यामुळे ग्रामस्थ आणि प्रवासी यांना प्रचंड गैरसोय होत असून, बससेवा पुन्हा सुरू करण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन अकोला व वाशीम येथील परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
मालेगाव–चोंडी–पिंपरडोळी या मार्गावर पूर्वीप्रमाणे बससेवा सुरळीत सुरू ठेवावी, यासाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा वाशीम आणि अकोला येथे निवेदने दिली आहेत. मात्र, संबंधित विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थ प्रवाशांकडून करण्यात आला आहे.
या भागात कोणतीही खाजगी वाहनसेवा उपलब्ध नसल्याने अनेक प्रवाशांना आलेगावपासून पायी प्रवास करावा लागतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्वी बससेवा सुरू होती; परंतु सध्या बंद असल्याने पुन्हा ती पूर्ववत सुरू करावी, अन्यथा ग्रामस्थांना तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.
वाशीम आणि मालेगाव येथील परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना चोंडीचे सरपंचपती विष्णू ठाकरे, दिलीप ताजणे, पिंपरडोळीचे उपसरपंच नारायण आल्हाट, सरपंच उकंडा ताजणे, अशोकजी ताजणे, बाबुराव ताजणे, वर्धमान ताजणे, मनोहरराव ठाकरे व किशोर ताजणे उपस्थित होते.
ग्रामस्थांनी दिला आंदाेलनाचा इशारा
या भागात बससेवा नसल्याने जेष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि महिला प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाच्या परिवहन सेवांचा लाभ गावकऱ्यांना मिळत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. लवकरच बससेवा सुरू करून ही समस्या दूर करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते दिलीप ताजणे यांनी दिला आहे

