Baliraja’s ‘white gold’ turned black: शेतकऱ्याचे अर्थचक्र हे पूर्णपणे शेतीमालावर अवलंबून असते. यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच पावसाचे अनियमित प्रमाण पाहायला मिळत आहे. खरिपातील बहुतांश पिके अतिवृष्टीमुळे नष्ट झाली आहेत. त्यामुळे कापूस हेच एकमेव आधारपीक राहिले असतानाच, गेल्या आठवडाभरात तालुक्यात बेमोसमी पावसाने पुन्हा थैमान घातले. अनेक महसूल मंडळांत अतिवृष्टी व सततच्या धारपावसामुळे वेचणीला आलेला कापूस भिजून काळवंडला असून त्याचा दर्जा घसरला आहे.

आधीच भाव नाही… त्यात कापसाचा दर्जा खालावला; हवालदिल झाला बळीराजा
गजानन तिडके
देऊळगाव राजा : शेतकऱ्याचे अर्थचक्र हे पूर्णपणे शेतीमालावर अवलंबून असते. यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच पावसाचे अनियमित प्रमाण पाहायला मिळत आहे. खरिपातील बहुतांश पिके अतिवृष्टीमुळे नष्ट झाली आहेत. त्यामुळे कापूस हेच एकमेव आधारपीक राहिले असतानाच, गेल्या आठवडाभरात तालुक्यात बेमोसमी पावसाने पुन्हा थैमान घातले. अनेक महसूल मंडळांत अतिवृष्टी व सततच्या धारपावसामुळे वेचणीला आलेला कापूस भिजून काळवंडला असून त्याचा दर्जा घसरला आहे.
पश्चिम विदर्भातील कापसाची पंढरी म्हणून ओळखले जाणारे देऊळगाव राजा शहर विदर्भ व मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. या भागात कापसाचे उत्पादन चांगले होत असल्यामुळे परराज्यातील व्यापाऱ्यांनी येथे १० ते १५ जिनिंग फॅक्टऱ्या सुरू केल्या आहेत. मात्र, सीसीआय (हमीभाव) केंद्र अद्याप सुरू नसल्याने स्थानिक बाजार समितीच्या आशीर्वादाने व्यापारी मनमानी भावाने कापसाची खरेदी करत आहेत.
तालुक्यात यावर्षी १७ हजार ४५७ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. खरिपातील सोयाबीन आणि इतर पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची सर्वाधिक अपेक्षा कपाशीवर होती. परंतु सततच्या पावसामुळे कापूस काळवंडला असून, दर्जा खालावल्याने व्यापारी सध्या फक्त ₹7,000 ते ₹7,300 प्रति क्विंटल इतकाच भाव देत आहेत. भिजलेल्या कापसाला पुढे किती भाव मिळेल, याबाबत अनिश्चितता आहे.

मदत तुटपुंजी; बाजार समितीची डोळेझाक
शासनाने “शेतकऱ्यांना मदत देत आहोत” असा गाजावाजा केला असला तरी मिळणारी मदत नाममात्र आणि अपुरी असल्याने त्यातून मशागतीचा खर्चही निघत नाही. सीसीआय हमीभाव ₹8,100 प्रति क्विंटल असतानाही केंद्र सुरू नसल्याने व्यापाऱ्यांची चंगळ सुरू आहे. बाजार समितीने याकडे पूर्णपणे डोळेझाक केली असून, शेतकऱ्यांच्या हिताऐवजी स्वहित साधण्यातच समिती पुढे आहे, अशी नाराजी शेतकऱ्यांत व्यक्त होत आहे.
“सद्यस्थितीत तालुक्यात सर्वत्र पाऊस सुरू आहे. शेतकऱ्यांनी वेचलेला कापूस भिजल्यानंतर त्याला योग्यरीत्या ऊन द्यावे, जेणेकरून कापसाचा दर्जा घसरणार नाही.”— भगवान कच्छवे, तालुका कृषी अधिकारी, देऊळगाव राजा“मी दोन एकरांवर कपाशीची लागवड केली आहे. सुरुवातीपासूनच किडीचा प्रादुर्भाव असल्याने अनेकदा फवारणी केली. कसाबसा पीक वाचवले, पण आता सततच्या पावसामुळे वेचलेला कापूस भिजून नासला आहे.” — — —भाऊसाहेब कोल्हे, शेतकरी

