Four lakh 30 thousand students : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांच्या तालावर सामूहिक कवायतीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला बुलढाणा जिल्ह्यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून तब्बल ४ लाख ३० हजार ७०४ विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर कवायतीत सहभाग नोंदवला. यासोबतच १७ हजार १३ शिक्षकांनी शाळा-शाळांमधून या उपक्रमाचे दिमाखदार आयोजन केले.

बुलढाणा : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांच्या तालावर सामूहिक कवायतीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला बुलढाणा जिल्ह्यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून तब्बल ४ लाख ३० हजार ७०४ विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर कवायतीत सहभाग नोंदवला. यासोबतच १७ हजार १३ शिक्षकांनी शाळा-शाळांमधून या उपक्रमाचे दिमाखदार आयोजन केले.
जिल्ह्याचे मुख्य शासकीय कवायत संचलन बुलढाणा पोलीस कवायत मैदानावर प्रजासत्ताक दिनी सकाळी साडेनऊ वाजता उत्साहात पार पडले. या संचलनात बुलढाणा शहरातील सात शाळांमधील २ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अत्यंत शिस्तबद्ध आणि राष्ट्रभक्तीने भारलेला हा सोहळा बुलढाणा शहरवासीयांनी अनुभवला.
या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सामुदायिक कवायतीचे आयोजन झाले. यावेळी आमदार संजय गायकवाड, नगराध्यक्षा पूजाताई गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, सर्व उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख तसेच बुलढाणा शहरातील विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) तसेच योजना विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. बुलढाणा पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा देशभक्तीपर उपक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.

