A nilgai was hunted : देशी बनावटीच्या बंदुकीने नीलगायची शिकार करून मास विक्री करणाऱ्या एकास वनविभागाच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे २२ जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर पहाटे ३ वाजताच्या सुमारास छापा टाकून अटक केली.

बार्शीटाकळी तालुक्यात वनविभागाची आतापर्यंतची मोठी कारवाई
बबन इंगळे
बार्शीटाकळी : देशी बनावटीच्या बंदुकीने नीलगायची शिकार करून मास विक्री करणाऱ्या एकास वनविभागाच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे २२ जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर पहाटे ३ वाजताच्या सुमारास छापा टाकून अटक केली.मजिद रुसूल खा अहमद रुसूल खा रा. इंदिरानगर, बार्शीटाकळी असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून वनविभागाच्या पथकाने नीलगायीचे मास व इतर साहित्य असा लाखो रुपयांचा एवज जप्त केला.
वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे) मु. धाबा अंतर्गत येणाऱ्या बार्शीटाकळी वनवर्तुळातील नियतक्षेत्र परंडा येथील कक्ष क्रमांक ३९२, मौजा भरतपूर येथील कुरण विकास रोपवनाजवळ नीलगायची शिकार करून तिचे मास विक्रीसाठी नेत असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती.
या माहितीच्या आधारे बार्शीटाकळी वनविभागाच्या पथकाने २२ जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर पहाटे ३ वाजताच्या सुमारास छापा टाकत घटनास्थळावरून एका आरोपीस ताब्यात घेतले. या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, वनविभागाने केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी मजिद रुसूल खा अहमद रुसूल खा (रा. इंदिरानगर, बार्शीटाकळी) याला घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध वनगुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू आहे.
वनविभागाच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता, अनुसूची–२ मध्ये समाविष्ट असलेल्या एका नीलगायची अवैधरित्या शिकार केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणातील काही आरोपी फरार असून, त्यांचा युद्धपातळीवर शोध सुरू असल्याची माहिती वनविभागाने दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून अंदाजे ४० किलो नीलगायचे मास, देशी बनावटीच्या २ बंदुका, ४ धारदार चाकू, कुऱ्हाड, कोयता, स्फोटक बारूद, बंदुकीचे छेरे, तसेच ट्रॅक्टरचा मुंडा असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई अकोला वन विभागाचे उपवनसंरक्षक व सहाय्यक वनसंरक्षक (वने) यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शीटाकळी वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित बोरकर, क्षेत्र सहाय्यक एस. डब्ल्यू. मुंडे, आर. आर. हिवराळे, वनरक्षक सी. डी. गवई, वाहनचालक दीपक भारसाकळे तसेच संरक्षण मजूर यांच्या पथकाने केली.

