agricultural materials: सध्या मेहकर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतातील स्प्रिंकलरच्या शेकडो तोट्यांसह विविध शेती अवजारे मोठ्या प्रमाणात चोरीस जात असून, चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे या चोरींचा पर्दाफाश करण्यासाठी विशेष पथक नेमावे, अशी मागणी मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अँड. रामेश्वर पळसकर यांनी 5 डिसेंबर रोजी बुलढाणा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

चोरट्यांच्या बंदोबस्तासाठी विशेष पथक नेमण्याची पळसकर यांची मागणी
डोणगाव : सध्या मेहकर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतातील स्प्रिंकलरच्या शेकडो तोट्यांसह विविध शेती अवजारे मोठ्या प्रमाणात चोरीस जात असून, चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे या चोरींचा पर्दाफाश करण्यासाठी विशेष पथक नेमावे, अशी मागणी मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अँड. रामेश्वर पळसकर यांनी 5 डिसेंबर रोजी बुलढाणा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
पळसकर यांनी निवेदनात नमूद केले की, दरवर्षी मेहकर तालुक्यात स्प्रिंकलर, पाईप, मोटार, केबल, गुरे-ढोरे व इतर शेती उपयोगी साहित्य चोरीचे प्रकार घडतात, मात्र यावर्षी चोरट्यांनी अक्षरशः विक्रम मोडला आहे. गेल्या काही दिवसांत अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील साहित्याची चोरी वाढली असून, शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक फटका बसत आहे.
शेतकरी तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशनला गेले असता त्यांचे गुन्हे ‘एनसी’ दाखल करून उडवाउडवीचे उत्तर देण्यात आल्याने तक्रारदारांचा विश्वास डळमळीत होत आहे. कोणतेही पोलिस अधिकारी या घटनांकडे गांभीर्याने पाहत नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदनात हवालदार पळसकर यांनी मुंबईतील एका अभिनेत्याच्या घरात झालेल्या चोरीप्रकरणात गृह विभागाने तात्काळ 15 पथकं नेमून आरोपीला गजाआड केले, परंतु ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे मात्र वर्षानुवर्षे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
“शेतकऱ्यांच्या शेकडो तक्रारी असूनही काहीही ठोस कारवाई होत नाही. जगाचा पोशिंदा मात्र वाऱ्यावर सोडला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला. जर या चोरींचा तपास करण्यासाठी तातडीने विशेष पथक नेमले नाही, तर नागपूर हिवाळी अधिवेशनात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पळसकर यांनी दिला असून, त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर राहील, असे नमूद केले आहे.
डोणगाव परिसरातील अवैध धंद्यांकडेही लक्ष देण्याची मागणी
सध्या डोणगाव परिसरात अवैध गुटखा विक्री, अवैध दारू विक्री, अवैध प्रवासी वाहतूक, अवैध रेती वाहतूक व गौण खनिज वाहतूक खुलेआम सुरू असल्याची नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. हे प्रकार डोणगाव पोलीस स्टेशनच्या जवळच होत असतानाही पोलिसांची कोणतीही दखल नसल्याने, डोणगाव हे अवैध धंद्यांचे माहेरघर बनत असल्याची चर्चा आहे. या सर्वांवर अंकुश आणण्यासाठी विशेष पथक नेमून प्रभावी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

