ACB trap : चान्नी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक महादेव मधुकरराव देशमुख (वय ५७) यांना ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने मंगळवारी, १८ ऑगस्ट रोजी रंगेहात पकडले. वाईन बारच्या ना-हरकत प्रमाणपत्रासाठी (NOC) लाच मागितल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. अकोला व वाशिम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या संयुक्त कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

६५ हजारांची मागणी, ३५ हजारांवर तडजोड; लाच स्वीकारताच उपनिरीक्षक महादेव देशमुख जाळ्यात
निशांत गवई
पातूर : चान्नी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक महादेव मधुकरराव देशमुख (वय ५७) यांना ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने मंगळवारी, १८ ऑगस्ट रोजी रंगेहात पकडले. वाईन बारच्या ना-हरकत प्रमाणपत्रासाठी (NOC) लाच मागितल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. अकोला व वाशिम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या संयुक्त कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे माळसूर, पांगरा रोड येथे ‘ बिअर अँड वाईन शॉपी’ असून, तेथे वाईन बार सुरू करण्यासाठी त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे रीतसर अर्ज केला होता. या अर्जाची पोलीस पडताळणी करून ना-हरकत प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया चान्नी पोलीस ठाण्यामार्फत होणार होती.
या कामासाठी पोलीस उपनिरीक्षक महादेव देशमुख यांनी तक्रारदाराकडे ६५ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार १२ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. त्यानंतर एसीबीने १२, १५ आणि १७ ऑगस्ट रोजी माळसूर येथे तक्रारीची पडताळणी केली. या पडताळणीत तडजोडीनंतर ३५ हजार रुपये देण्याचे ठरल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी ३० हजार रुपये ठाणेदारांसाठी आणि ५ हजार रुपये स्वतःसाठी असल्याचे देशमुख यांनी सांगितल्याचे एसीबीच्या अहवालात नमूद आहे.
दरम्यान, तक्रारदाराने चान्नी पोलीस ठाण्याचे ठाणेदार दराडे यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली असता, देशमुख यांनी ठाणेदारांना भेटण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले. एसीबीने १२ ऑगस्ट रोजी ठाणेदार दराडे यांच्याबाबत स्वतंत्र पडताळणी केली असता, त्यांच्याकडून NOC साठी पैशांची मागणी झाल्याचे आढळून आले नाही.
ठरल्याप्रमाणे १८ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे १०.३७ वाजता चान्नी पोलीस ठाण्यातील खुबिया कक्षात तक्रारदाराकडून ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने पोलीस उपनिरीक्षक महादेव देशमुख यांना रंगेहात पकडले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आरोपीच्या निवासस्थानी घरझडतीची कारवाईही करण्यात आली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वाशिम घटकाच्या पोलीस निरीक्षक सुलभा राऊत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलीस हवालदार विनोद मारकंडे, समाधान मोघाड, पोलीस अंमलदार मनोहर हेम्बाडे आणि वाहनचालक नावेद शेख यांचा समावेश होता. पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक जगदीश परदेशी यांनी केले. अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
दरम्यान, भ्रष्टाचारासंदर्भात किंवा कोणत्याही लोकसेवकाने लाच मागितल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

