loan waiver : बँक ऑफ महाराष्ट्र, देऊळगाव राजा शाखेच्या कथित चुकीमुळे शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळत नसल्याचा आरोप करीत बोराखेडी बावरा येथील शेतकरी अरुण गणेशराव शेरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे दाद मागितली आहे. बँकेने त्यांच्या संमतीशिवाय पीककर्जाचे पुनर्गठन केल्याने कर्जमाफीच्या निकषात ते बसत नसल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

बँकेने परस्पर कर्जाचे पुनर्गठन केल्याचा आरोप; कर्जमाफीचा लाभ देण्याची मागणी
गजानन तिडके
देऊळगाव राजा : बँक ऑफ महाराष्ट्र, देऊळगाव राजा शाखेच्या कथित चुकीमुळे शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळत नसल्याचा आरोप करीत बोराखेडी बावरा येथील शेतकरी अरुण गणेशराव शेरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे दाद मागितली आहे. बँकेने त्यांच्या संमतीशिवाय पीककर्जाचे पुनर्गठन केल्याने कर्जमाफीच्या निकषात ते बसत नसल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
शेरे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, त्यांनी सन २०२० मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या देऊळगाव राजा शाखेतून पीककर्ज घेतले होते. मात्र, बँकेने बँकेचा एनपीए कमी करण्यासाठी त्यांच्या परवानगीशिवाय पीककर्जाचे पुनर्गठन केले. त्यामुळे सध्याच्या नोंदीनुसार त्यांचे पीककर्ज थकीत किंवा नियमित स्वरूपात राहिले नसल्याने ते शासनाच्या कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरत नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
बँकेच्या या प्रक्रियेमुळे आपण शासनाच्या कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहिलो असून, याला संबंधित बँक जबाबदार असल्याचा आरोप शेरे यांनी केला आहे.
आपले पीककर्ज कर्जमाफी योजनेत समाविष्ट करून कर्जमाफीचा लाभ मिळवून द्यावा तसेच बँकेच्या कथित चुकीची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी अरुण शेरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी सादर केलेल्या या निवेदनाद्वारे त्यांनी प्रशासनाकडे न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

