MLA Manoj Kayande :बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी झालेल्या सर्वपक्षीय समझोत्याला अखेर सुरुंग लागला आहे. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार मनोज कायंदे यांनी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार’ पॅनलविरुद्ध रणशिंग फुंकले आहे. आमदार कायंदे यांनी आमदार विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत ‘स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल’ ची घोषणा केली. यावेळी संतोष खांडेभराड, विजयसिंह राजपूत आणि मनीष बोरकर उपस्थित होते.

‘स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल’ची घोषणा; १६ वर्षांनंतर जिल्हा बँकेत राजकीय संघर्ष, ९ जागांसाठी रंगणार सामना
गजानन तिडके
देऊळगाव राजा : बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी झालेल्या सर्वपक्षीय समझोत्याला अखेर सुरुंग लागला आहे. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार मनोज कायंदे यांनी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार’ पॅनलविरुद्ध रणशिंग फुंकले आहे. आमदार कायंदे यांनी आमदार विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत ‘स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल’ ची घोषणा केली. यावेळी संतोष खांडेभराड, विजयसिंह राजपूत आणि मनीष बोरकर उपस्थित होते.
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी खामगाव येथे सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली होती. मात्र, या बैठकीत झालेल्या समझोत्याला अपेक्षित यश न मिळाल्याने अखेर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील उमेदवार ‘सहकार’ पॅनलच्या माध्यमातून रिंगणात आहेत. दुसरीकडे आमदार मनोज कायंदे यांनी स्वतंत्र पॅनल उभे करून या निवडणुकीत थेट आव्हान दिले आहे.
१२ संचालक बिनविरोध; ९ जागांसाठी थेट लढत
जिल्हा बँकेच्या एकूण २१ संचालकपदांपैकी १२ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. आता उर्वरित आठ मतदारसंघांतील नऊ संचालकपदांसाठी निवडणूक होणार आहे. या जागांसाठी आमदार मनोज कायंदे यांच्या ‘स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल’ने उमेदवार मैदानात उतरविले आहेत.त्यामुळे डॉ. राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या ‘सहकार’ पॅनलसमोर आमदार कायंदे यांच्या पॅनलचे थेट आव्हान उभे राहिले आहे. सुरुवातीला बिनविरोध होण्याची शक्यता असलेली ही निवडणूक आता राजकीय प्रतिष्ठेच्या लढाईत परिवर्तित झाली आहे.
१६ वर्षांनंतर पुन्हा निवडणुकीचा सामना
जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची निवडणूक तब्बल १६ वर्षांनंतर होत असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सहकार क्षेत्रातील निवडणूक असली तरी त्यामागे जिल्ह्यातील राजकीय समीकरणेही मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकत असल्याचे चित्र आहे. उर्वरित नऊ जागांसाठी २३ ऑगस्ट रोजी मतदान, तर २४ ऑगस्ट रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. १२ ऑगस्ट रोजी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.
विजय कोणाचा? अध्यक्षपदावरही नजर
जिल्हा बँकेतील बहुतांश संचालक बिनविरोध निवडून आले असले तरी उर्वरित नऊ जागांवरील लढत आता निर्णायक ठरणार आहे. आमदार मनोज कायंदे यांनी उभारलेल्या स्वतंत्र पॅनलमुळे शिंगणे-जाधव यांच्या ‘सहकार’ पॅनलसमोर राजकीय आव्हान निर्माण झाले आहे. या निवडणुकीत कोणत्या पॅनलला किती जागा मिळतात, यावरच जिल्हा बँकेच्या आगामी सत्तेचे गणित अवलंबून राहणार आहे. त्यामुळे संचालकपदाच्या निवडणुकीसोबतच पुढील काळात जिल्हा बँकेचा अध्यक्ष कोण होणार, याकडेही संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

