RTO cracks down :शहरासह जिल्ह्यात विविध मार्गांवर सुरू असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) धडक तपासणी मोहीम सुरू केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची नियमित तपासणी केली जात असून, दोषी वाहनचालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जात आहे. आरटीओच्या या कारवाईमुळे नियमबाह्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

नियमबाह्य प्रवासी वाहतुकीला लगाम; आरटीओची धडक कारवाई, ६.५० लाखांचा दंड
आगाखान पठाण
अकोला : शहरासह जिल्ह्यात विविध मार्गांवर सुरू असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) धडक तपासणी मोहीम सुरू केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची नियमित तपासणी केली जात असून, दोषी वाहनचालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जात आहे. आरटीओच्या या कारवाईमुळे नियमबाह्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
अकोला आरटीओचे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर आणि सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मोहम्मद समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. शहरातील प्रमुख मार्ग, बसस्थानके, गर्दीची ठिकाणे तसेच प्रवासी वाहतुकीच्या मार्गांवर अचानक वाहनांची तपासणी केली जात आहे.
दीड महिन्यात ७०० हून अधिक वाहनांची तपासणी
मागील महिन्यात आरटीओच्या पथकाने जिल्ह्यातील विविध मार्गांवर सुमारे ५५० वाहनांची तपासणी केली. त्यामध्ये ४६ बस आणि २२ ऑटोरिक्षा दोषी आढळून आल्या. संबंधित वाहनांकडे आवश्यक कागदपत्रांचा अभाव, प्रवासी वाहतुकीसंदर्भातील नियमांचे उल्लंघन तसेच मोटार वाहन कायद्यातील इतर नियमांचे पालन न केल्याचे निदर्शनास आले. दोषी वाहनांवर कारवाई करून सुमारे तीन लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला.
मागील महिन्यातील कारवाईनंतरही आरटीओ विभागाने मोहीम थांबविलेली नसून, याही महिन्यात तपासणीला वेग देण्यात आला आहे. या महिन्यात आतापर्यंत २५ बस, १७ ऑटोरिक्षा आणि १० मॅक्सिमो वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यातील आवश्यक कागदपत्रे नसलेली अनेक वाहने अटकावून ठेवण्यात आली आहेत. या कारवाईत दोषी वाहनांकडून सुमारे साडेतीन लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
विशेष पथकाकडून अचानक तपासणी
अवैध प्रवासी वाहतुकीविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी आरटीओ विभागाने विशेष पथक नियुक्त केले आहे. वरिष्ठ मोटार वाहन निरीक्षक किरणकुमार लोणे, राजकुमार मोरमारे, अनिरुद्ध देवधर, संदीप तायडे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विनोद जाधव आणि ममता इंगोले तसेच वाहनचालक गौतम अरखराव व अनिल गुंजकर यांचा पथकात समावेश आहे.
हे पथक जिल्ह्यातील विविध भागांत अचानक वाहन तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर तत्काळ कारवाई करीत आहे. विशेषतः प्रवासी वाहतुकीच्या मार्गांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
परवाना, फिटनेस, विम्याची तपासणी
प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा परवाना, फिटनेस प्रमाणपत्र, विमा, प्रदूषण प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. याशिवाय वाहनाची प्रत्यक्ष स्थिती, निर्धारित प्रवासी क्षमता आणि प्रवासी वाहतुकीचा परवाना यांचीही पडताळणी करण्यात येत आहे.
काही वाहनचालक वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहून नेत असल्याचेही तपासणीत आढळून आले आहे. अशा प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कोणतीही तडजोड न करता कारवाई केली जात आहे.
प्रवाशांनीही काळजी घेण्याचे आवाहन
अवैध प्रवासी वाहतुकीमुळे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असते. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहून नेणे, आवश्यक परवाना नसताना व्यावसायिक प्रवासी वाहतूक करणे किंवा वाहनाची नियमित तपासणी न करणे यामुळे अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे प्रवाशांनी अनधिकृत किंवा नियमबाह्य वाहनांमधून प्रवास करणे टाळावे आणि अधिकृत व सुरक्षित प्रवासी वाहतूक साधनांचाच वापर करावा, असे आवाहन आरटीओ प्रशासनाने केले आहे.
कारवाई अधिक तीव्र होणार
अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी आगामी काळातही तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. आवश्यक कागदपत्रे नसलेली किंवा नियमबाह्य पद्धतीने प्रवासी वाहतूक करणारी वाहने अटकावून ठेवण्याची कारवाई सुरू राहणार आहे.
प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनमालक आणि चालकांनी सर्व कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत, वाहनाची निर्धारित प्रवासी क्षमता पाळावी आणि मोटार वाहन कायद्यातील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आरटीओ विभागाने स्पष्ट केले आहे. आरटीओच्या या धडक मोहिमेमुळे अवैध प्रवासी वाहतुकीला आळा बसण्यास मदत होत असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वपूर्ण ठरत आहे.

