Mahabreaking

[breaking_news]

Cash and gold : दानपेटी फोडून मंदिरातील रोकड, सोन्या-चांदीचे दागिने लंपास; आरोपी ४८ तासांत जेरबंद  

Cash and gold : जानेफळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोळी येथील नागेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम तसेच दानातील मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या आरोपीला जानेफळ पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत जेरबंद केले. पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे मंदिर चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात यश आले असून, आरोपीकडून एकूण १ लाख ९८४ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Cash and gold

   CCTV फुटेज अन् गोपनीय माहितीच्या आधारे मंदिर चोरी उघडकीस; मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मेहकर :  मोळी येथील नागेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम तसेच दानातील मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या आरोपीला जानेफळ पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत जेरबंद केले. पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे मंदिर चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात यश आले असून, आरोपीकडून एकूण १ लाख ९८४ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याप्रकरणी शिवचंद्र मोरेश्वर संस्थानचे अध्यक्ष संदीप महादेव नागरिक यांच्या फिर्यादीवरून ९ ऑगस्ट २०२६ रोजी जानेफळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७०/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जानेफळ पोलिसांनी तपासाला वेग दिला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली. तसेच गोपनीय बातमीदारांकडून माहिती संकलित करण्यात आली. या तपासादरम्यान सावत्रा येथील भीमराव माधव गवई याच्याबाबत पोलिसांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली.

चौकशीदरम्यान आरोपीने दानपेटी फोडून चोरी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून चोरीस गेलेली रोख रक्कम, दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेले साहित्य आणि वाहन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

एक लाखांचा मुद्देमाल हस्तगत

आरोपीकडून दानपेटीतून चोरी केलेली १८ हजार ९८४ रुपयांची रोख रक्कम, ५००, ५०, २० आणि १० रुपयांच्या नोटा तसेच १, २ आणि ५ रुपयांची नाणी हस्तगत करण्यात आली. याशिवाय आरोपीने वापरलेले दोन मोबाईल फोन, अंदाजे २५ हजार रुपये किमतीचे; दानपेटीत दान केलेला एक ग्रॅम वजनाचा सोन्याचा नाग, अंदाजे १५ हजार रुपये किमतीचा; एक ग्रॅम वजनाचा चांदीचा नाग आणि गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटारसायकल, अंदाजे ४२ हजार रुपये किमतीची, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तसेच दानपेटी फोडण्यासाठी वापरलेले लोखंडी गजही पोलिसांनी हस्तगत केले आहेत. अशाप्रकारे आरोपीकडून एकूण १ लाख ९८४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तपासादरम्यान मुख्य आरोपीने या गुन्ह्यात दोन विधी संघर्षग्रस्त अल्पवयीन बालकांचा सहभाग असल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या बाबत पुढील तपास व कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या ४८ तासांत आरोपीला निष्पन्न करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल शिवचंद्र मोरेश्वर संस्थानचे पदाधिकारी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी जानेफळ पोलिसांच्या तात्काळ आणि प्रभावी कारवाईचे कौतुक केले आहे.

सदर कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईमध्ये एपीआय माळी, पीएसआय जाधव, हेडकॉन्स्टेबल मोहन सावंत, पोलीस कॉन्स्टेबल भागवत पाटोळे, माधव काळे, कृष्णा निकम आणि प्रदीप सौभाग्य यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

जानेफळ पोलीस ठाण्याकडून चोरीच्या गुन्ह्यांचा तातडीने तपास करून आरोपी निष्पन्न करण्यासोबतच चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी प्रभावी कार्यवाही सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top