Ashadhi Kartiki: “आषाढी कार्तिकी विसरू नका मज! सांगतसे गुज पांडुरंगा!!” या संतवाणीने भरलेल्या वातावरणात आज श्रीक्षेत्र केशव शिवणी येथे कार्तिकी एकादशीच्या मुख्य पर्वानिमित्त श्री केशवराज विष्णू भगवानांचा महाअभिषेक सोहळा अत्यंत भक्तीभावाने पार पडला.

श्रीक्षेत्र केशव शिवणी येथे कार्तिकी एकादशीनिमित्त महाअभिषेक
फकीरा पठाण
मलकापूर पांग्रा : “आषाढी कार्तिकी विसरू नका मज! सांगतसे गुज पांडुरंगा!!” या संतवाणीने भरलेल्या वातावरणात आज श्रीक्षेत्र केशव शिवणी येथे कार्तिकी एकादशीच्या मुख्य पर्वानिमित्त श्री केशवराज विष्णू भगवानांचा महाअभिषेक सोहळा अत्यंत भक्तीभावाने पार पडला.
सकाळी ब्रह्ममुहूर्तावर पाच वाजता अभिषेक व महापूजेस प्रारंभ झाला. मंदिर संस्थानचे विश्वस्त तथा अध्यक्ष वसंतराव नारायणराव उदावंत यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा संपन्न झाली. दही, दूध, मध आणि गंगेच्या पवित्र जलाने भगवान श्री केशवराज यांच्या चतुर्भुज शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेल्या दिव्य मूर्तीचा महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर देवाला शोडशोपचार पद्धतीने नैवेद्य अर्पण करून धूप–दीप प्रज्वलित करत महाआरती करण्यात आली.
श्रीक्षेत्र केशव शिवणी हे ठिकाण चार दगडी हेमाडपंथी कोरीव शिल्पांनी सजलेले धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जाते. ग्रामस्थांच्या पुढाकाराने भगवान विष्णू केशवराज, संत ज्ञानेश्वर माऊली, संत मुक्ताबाई, संत नरहरी महाराज, जगतपिता श्रीराम प्रभू, पार्वती माता, गणराज गणपती आणि शंकर भोलेनाथ यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा याच वर्षी थाटामाटात पार पडला.
अनेक संत, महंत व गुनीजनांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली असून, गेल्या २३ वर्षांपासून येथे श्रीराम नवमी उत्सव, नामसप्ताह, भजन–कीर्तन आणि अन्नदान या परंपरा भक्तिभावाने सुरू आहेत. कृष्णाशीला दगडात कोरलेली श्री केशवराज यांची मूर्ती पाहताच भाविकांच्या मनात भक्तिभावाचा सागर दाटतो.
संस्थानच्या परंपरेनुसार दररोज देवाला स्नान, संध्याकाळी दोन वेळा आरती व नैवेद्य अर्पण केले जाते. आजच्या महाअभिषेक सोहळ्यासाठी संस्थानचे विश्वस्त, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, शिक्षण समिती अध्यक्ष, पोलीस पाटील, पत्रकार बांधव तसेच ग्रामस्थ, महिला आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

