Urs-e-Naqshbandi: येथील केंद्रीय इल्मी व रूहानी खानकाह-ए-नक्शबंदिया येथे सिलसिला-ए-नक्शबंदिया मुजद्दिदियाचे महान संत, कुतुबुल-अक्तााब, सालार-ए-सिलसिला, शैखुल औलिया व शैखुल इस्लाम हजरत सय्यद शाह इनायतुल्लाह हसनी हुसेनी नक्शबंदी मुजद्दिदी कादरी रहमतुल्लाह अलैह यांचा ३३१ वा वार्षिक उर्स-ए-मुबारक रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी ५६ सफरुल मुजफ्फर १४४८ हिजरीनिमित्त श्रद्धा, अकीदत आणि आदराने साजरा करण्यात येणार आहे.

अकीदत आणि श्रद्धेने बाळापूरमध्ये ३३१ वा उर्स-ए-नक्शबंदी; उलमा व मशाईख यांची प्रवचने
बाळापूर : येथील केंद्रीय इल्मी व रूहानी खानकाह-ए-नक्शबंदिया येथे सिलसिला-ए-नक्शबंदिया मुजद्दिदियाचे महान संत, कुतुबुल-अक्तााब, सालार-ए-सिलसिला, शैखुल औलिया व शैखुल इस्लाम हजरत सय्यद शाह इनायतुल्लाह हसनी हुसेनी नक्शबंदी मुजद्दिदी कादरी रहमतुल्लाह अलैह यांचा ३३१ वा वार्षिक उर्स-ए-मुबारक रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी ५६ सफरुल मुजफ्फर १४४८ हिजरीनिमित्त श्रद्धा, अकीदत आणि आदराने साजरा करण्यात येणार आहे.
या उर्सच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पीर-ए-तरीकत हजरत सय्यद शाह इजहारुल इस्लाम तालिब नक्शबंदी साहेब, सज्जादानशीन, खानकाह-ए-नक्शबंदिया, बाळापूर हे राहणार आहेत. कायद-ए-बरार हजरत सय्यद शाह जहीरुल इस्लाम जकी मियां नक्शबंदी साहेब, मुतवल्ली, खानकाह-ए-नक्शबंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
असरनंतर खत्म-ए-कुरआनखानीने कार्यक्रमास प्रारंभ
रविवारी नमाज-ए-असरनंतर खत्म-ए-कुरआनखानीने उर्सच्या धार्मिक कार्यक्रमास प्रारंभ होईल. नमाज-ए-मगरिबनंतर जश्न-ए-फैजान-ए-नक्शबंदचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उलमा-ए-किराम व मशाईख-ए-इजाम यांची धार्मिक प्रवचने होणार आहेत.
त्यानंतर हजरत शैखुल इस्लाम यांच्या बारगाहमध्ये संदल मुबारक सादर करण्यात येईल. फातिहा पठण व सलामनंतर विशेष दुआ करण्यात येणार आहे. नमाज-ए-इशानंतर तबर्रुक वितरण तसेच महफिल-ए-नातचे आयोजन करण्यात आले आहे.
फज्रनंतर मुराकबा, सलाम व विशेष दुआ
सोमवारी नमाज-ए-फज्रनंतर मुराकबा, सलाम व विशेष दुआचा कार्यक्रम होईल. तसेच १० ऑगस्ट रोजी नमाज-ए-मगरिबनंतर शजरा ख्वानी तसेच कुरआन व तसव्वुफ या विषयांवर विशेष दर्स आयोजित करण्यात आला आहे.
याच अनुषंगाने हजरत इमाम रब्बानी मुजद्दिद अल्फ सानी रहमतुल्लाह अलैह यांची वार्षिक फातिहाही अदा करण्यात येणार आहे.
प्रेम, शांतता आणि बंधुभावाचा संदेश
३३१ वा उर्स-ए-नक्शबंदिया हा धार्मिक कार्यक्रमासोबतच इस्लाममधील प्रेम, शांतता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारा आध्यात्मिक सोहळा आहे. कुरआन व पैगंबर-ए-इस्लाम यांच्या शिकवणी समाजापर्यंत पोहोचविण्यासोबतच परस्पर प्रेम, सलोखा आणि शांततेचा संदेश देण्याचे कार्य खानकाहच्या माध्यमातून केले जाते.
खानकाह-ए-नक्शबंदिया, बाळापूरचे नामनिर्देशित सज्जादानशीन सय्यद अदनान मियां नक्शबंदी मुजद्दिदी यांनी सर्व अकीदतमंदांनी उर्समधील धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

