Financial difficulties : येथील गजाननवाडी परिसरात शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या प्रतिक रमेश इंगळे (वय ३०) या तरुणाने गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकल्याचे पितृछत्र हरपले आहे.

तीन वर्षांच्या चिमुकल्याचे पितृछत्र हरपले; वडिलांनी मुलाचे नेत्रदान केले
वाडेगाव : येथील गजाननवाडी परिसरात शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या प्रतिक रमेश इंगळे (वय ३०) या तरुणाने गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकल्याचे पितृछत्र हरपले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिक यांच्या पत्नीला सुमारे सहा महिन्यांपूर्वी अर्धांगवायूचा त्रास झाला होता. त्यानंतर त्यांच्या डोक्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. पत्नीच्या उपचारांचा वाढता खर्च, हलाखीची आर्थिक परिस्थिती आणि शेतमजुरीवर अवलंबून असलेले कुटुंबाचे उत्पन्न यामुळे प्रतिक यांच्यावर मोठा आर्थिक व मानसिक ताण निर्माण झाल्याचे सांगण्यात येते.
दुःखाच्या प्रसंगी वडिलांचा माणुसकीचा निर्णय
मुलाच्या निधनाच्या दुःखातून जात असतानाही प्रतिक यांच्या वडिलांनी अत्यंत माणुसकीचा निर्णय घेत मुलाचे नेत्रदान करण्याचा संकल्प केला. “माझ्या मुलाच्या डोळ्यांमुळे एखाद्या गरजू व्यक्तीला दृष्टी मिळाली, तर माझ्या मुलाचे मरण सार्थक होईल,” अशी हृदयस्पर्शी भावना त्यांनी व्यक्त केली.
नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी डॉ. राखी राठोड, नेत्रदान समुपदेशक नंदन चोरपगार, जिल्हा सामान्य रुग्णालय, अकोला, तसेच रिजवाना मॅडम आणि डॉ. राठोड, ग्रामीण रुग्णालय, बाळापूर यांनी आवश्यक सहकार्य व मार्गदर्शन केले.
मुलाच्या डोळ्यांतून दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश
तरुण मुलाला गमावण्याचे दुःख असतानाही त्याच्या डोळ्यांमधून दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश आणण्याचा निर्णय घेणे ही बाब समाजासाठी प्रेरणादायी ठरली आहे. प्रतिक यांच्या वडिलांनी दुःखाच्या क्षणी घेतलेल्या या निर्णयामुळे नेत्रदानाचे महत्त्व आणि अवयवदानाबाबतची सामाजिक जाणीव अधोरेखित झाली आहे.
“माझ्या मुलाच्या डोळ्यांनी दुसऱ्याला जग पाहता यावे. मुलाला गमावल्याचे दुःख कधीही भरून निघणार नाही. मात्र, माझ्या मुलाच्या डोळ्यांमुळे एखाद्या गरजू व्यक्तीला जग पाहता आले, तर माझ्या मुलाचे मरण सार्थकी लागल्याचे समाधान मिळेल,” अशी भावना प्रतिक यांच्या वडिलांनी व्यक्त केली.
या घटनेमुळे आर्थिक व कौटुंबिक संकटात सापडलेल्या व्यक्तींना वेळेवर मानसिक आधार, कुटुंबीयांचे सहकार्य आणि योग्य मार्गदर्शन मिळण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. संकटाच्या काळात व्यक्तीने एकटे न राहता विश्वासातील व्यक्तींशी संवाद साधून आवश्यक मदत व आधार घेणे गरजेचे आहे.

