Ekta Daud rally in Deulgaon Raja: भारताचे पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त बुलढाणा पोलिस दल आणि देऊळगाव राजा पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एकता दौड’ रॅलीचे आयोजन करण्यात आले.

देऊळगाव राजा : भारताचे पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त बुलढाणा पोलिस दल आणि देऊळगाव राजा पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एकता दौड’ रॅलीचे आयोजन करण्यात आले.
रविवारी सकाळी आठ वाजता शिवाजी हायस्कूल येथून रॅलीला सुरुवात झाली. बसस्थानक, संतोष टॉकीज चौक, गीतांजली टॉकीज चौक, अमर जवान चौक मार्गे पुन्हा शिवाजी हायस्कूल येथे रॅलीचा समारोप झाला. या रॅलीत विद्यार्थी, शिक्षक, पोलीस अधिकारी-कर्मचारी, शहरातील ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक, पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम्”च्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले. समारोप प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांनी राष्ट्रीय एकता आणि अखंडता टिकवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपले योगदान द्यावे, तसेच युवकांनी व्यसनांपासून दूर राहावे, असे आवाहन केले. त्यानंतर उपस्थित सर्वांनी राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या प्रसंगी पोलीस उपविभागीय अधिकारी मनीषा कदम, सतीश कायंदे, पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत शिंदे, उपनिरीक्षक दत्ता नरवाडे, धनसिंग शिपने, प्रकाश खांडेभराड यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, माजी सैनिक आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

