Prataprao Jadhav: जिल्ह्यात ३० व ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील गावांची केंद्रीय आयुष व आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शनिवारी प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीचा आढावा घेत त्यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून अहवाल शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले.

जळगाव जामोद-संग्रामपूर तालुक्यातील नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी; बाधितांना त्वरित मदतीचे आश्वासन
बुलढाणा : जिल्ह्यात ३० व ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील गावांची केंद्रीय आयुष व आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शनिवारी प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीचा आढावा घेत त्यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून अहवाल शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले.
गेल्या दोन दिवसांतील मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून, जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर प्रतापराव जाधव यांनी ३१ जुलै रोजी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला होता. तसेच, प्रशासनाने आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळेल, यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या होत्या.
आज जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी चावरा, इलोरा, मडाखेड खुर्द, मडाखेड बुद्रुक, काजेगाव, बोराळा बुद्रुक, बोराळा खुर्द, खेर्डा खुर्द, खेर्डा बुद्रुक, चांगेफळ, रुधाणा आणि वकाणा या गावांना भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांचे, शेतजमिनींचे तसेच घरांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत दिली जाईल आणि कोणत्याही पात्र लाभार्थ्याला मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांचे, शेतीचे तसेच घरांच्या पडझडीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून त्याचा अहवाल शासनाकडे पाठवावा, जेणेकरून मदत वितरणाच्या प्रक्रियेला विलंब होणार नाही, असे निर्देशही त्यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
या पाहणी दौऱ्यात तहसीलदार पवन पाटील, अजाबराव वाघ, कृषी अधिकारी रमेश वाघ, गटशिक्षणाधिकारी ऐश्वर्या कोरे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

