farmers desperate: तेल्हारा तालुक्यात आधीच अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यातच आता कोरडवाहू हंगामात हरभऱ्याच्या पिकावर रानडुकरांचा धुमाकूळ सुरू असून शेतकरी हतबल झाले आहेत.

तळेगाव बाजार : तेल्हारा तालुक्यात आधीच अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यातच आता कोरडवाहू हंगामात हरभऱ्याच्या पिकावर रानडुकरांचा धुमाकूळ सुरू असून शेतकरी हतबल झाले आहेत.
तळेगाव बाजार परिसरात यंदा कोरडवाहू हरभरा पेरणी बऱ्यापैकी झाली आहे. येथील शेतकरी शिवाजी दिनकर खारोडे यांनी अडीच एकर क्षेत्रात शेती केली आहे. यापूर्वी त्यांनी सोयाबीन पिकाची लागवड केली होती. मात्र अतिवृष्टीमुळे त्या अडीच एकरातून केवळ दोन क्विंटल उत्पादन मिळाले. त्यामुळे खर्च वसूल करण्याच्या आशेने त्यांनी अडीच एकरात कोरडवाहू हरभऱ्याची पेरणी केली.
मात्र रानडुकरांनी रात्रीतून शेतात धुमाकूळ घालून संपूर्ण हरभऱ्याचे पीक फस्त केले आहे. परिणामी पिक पूर्णपणे नेस्तनाबूत झाले असून शेतकरी खारोडे हताश झाले आहेत.
या परिसरात रानडुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून वनविभागाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. अतिवृष्टीमुळे आधीच सोयाबीन आणि कपाशी पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता हरभऱ्याचेही नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
वनपाल अधिकारी सुनील राऊत (अकोट) यांनी सांगितले की, “ज्या शेतकऱ्यांचे पिक रानडुकर, हरिण किंवा अन्य वन्यप्राण्यांमुळे नष्ट झाले आहे, त्यांनी ऑनलाईन अर्ज वनविभागाकडे करावा. पाहणी करून पंचनामा तयार करून अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाईल.”शेतकरी शिवाजी खारोडे म्हणाले, “मी लागवड करून शेतात दिवस-रात्र मेहनत घेतली, मात्र रानडुकरांनी सर्व पीक उध्वस्त केले. शासनाने पंचनामा करून मला प्रति एकर ५० हजार रुपये मदत द्यावी.”

