Ashadhi Ekadashi : स्थानिक उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शाळेत दिंडी सोहळा, अभंग गायन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उज्ज्वला नरेंद्र सोनोने आणि प्रशासकीय अधिकारी सौ. नीता राजेंद्र बोबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

‘विठ्ठल… विठ्ठल’च्या गजरात उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी
बोरगाव मंजू : स्थानिक उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शाळेत दिंडी सोहळा, अभंग गायन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उज्ज्वला नरेंद्र सोनोने आणि प्रशासकीय अधिकारी सौ. नीता राजेंद्र बोबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
आषाढी एकादशीचे औचित्य साधून शाळेत आकर्षक दिंडी काढण्यात आली. विठ्ठल-रुक्मिणीची सुंदर पालखी सजविण्यात आली होती. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि ‘विठ्ठल… विठ्ठल… जय हरी विठ्ठल’ या जयघोषात विद्यार्थ्यांनी दिंडीत उत्साहाने सहभाग घेत संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून टाकला.
यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रुक्मिणी, वारकरी तसेच पारंपरिक वेशभूषा परिधान करून उपस्थितांची मने जिंकली. टाळ-चिपळ्यांच्या तालावर अभंग गायन, फुगड्या आणि पारंपरिक नृत्य सादर करून विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेचे दर्शन घडविले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा, संत साहित्य आणि वारकरी संप्रदायाचे महत्त्व समजावून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. यामध्ये सौ. जया हगवणे, सौ. राऊत, सौ. स्वाती जैन, सौ. दिपाली देशमुख, सौ. दुर्गा असोलमोल, सौ. अश्विनी माहुलकर, सौ. मीना वानखडे, सौ. रूपाली कडू, कु. मोहिनी इंगळे, सौ. शारदा देशमुख, सौ. प्रीती वाघमारे, श्री. प्रशांत होनाळे, सौ. रूपाली इंगळे, पूजा भराटे, प्रतीक वानखडे, सौ. रंजना चौरे आणि सौ. प्रतीक्षा दळवी यांचा समावेश होता.
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांच्या सहकार्यामुळे हा सोहळा अत्यंत भक्तिमय, सांस्कृतिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्म, संस्कृती आणि सामाजिक ऐक्याची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.

