Cattle being taken : गुप्त माहितीच्या आधारे पातूर पोलिसांनी केलेल्या धाडीत कत्तलीसाठी नेण्यात येत असलेले पाच गुरांना पोलिसांनी जीवनदान दिले. पोलिसांनी दोन वाहनांसह सुमारे ९ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तिघांविरुद्ध विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुप्त माहितीच्या आधारे पातूर पोलिसांची कारवाई; ९.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त
निशांत गवई
पातूर : गुप्त माहितीच्या आधारे पातूर पोलिसांनी केलेल्या धाडीत कत्तलीसाठी नेण्यात येत असलेले पाच गुरांना पोलिसांनी जीवनदान दिले. पोलिसांनी दोन वाहनांसह सुमारे ९ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तिघांविरुद्ध विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जुलै रोजी सकाळी सुमारे ९ वाजता पातूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुहास गोसावी यांना गुप्त माहिती मिळाली की, दोन मालवाहू वाहनांमधून गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी आणून पातूर नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक २ परिसरात उतरविण्यात येत आहेत.
माहितीची खातरजमा करून पोलिसांनी पंचांसह तातडीने छापा टाकला. या कारवाईत एमएच-३० बीडी-७६७० क्रमांकाची बुलेरो पिकअप आणि एमएच-०२ सीई-६७२० क्रमांकाचे छोटा हत्ती मालवाहू वाहन अशी दोन वाहने आढळून आली. दोन्ही वाहनांमध्ये एकूण पाच गोवंशीय बैल क्रूरपणे बांधून ठेवलेले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
यावेळी पोलिसांनी शिवानंद वसंतराव मोकळकर (रा. ढोणे नगर, पातूर), अब्दुल आलीम अब्दुल करीम कुरेशी (रा. जमदार प्लॉट, पातूर) आणि ख्वाजा आसीफ अली खान जमीर अली (रा. काजीपुरा किल्ला, पातूर) यांना ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान आरोपी शिवानंद मोकळकर हा पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पडल्याने त्याच्या पायाला दुखापत झाली असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात तीन बैल, बुलेरो पिकअप, दोन बैल आणि छोटा हत्ती वाहनाचा समावेश असून, एकूण मुद्देमालाची किंमत ९ लाख ४५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३२५, तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमातील कलम ५, ५अ, ५ब, ९ आणि प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० च्या कलम ११(१)(ल) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सुहास गोसावी, पोलीस उपनिरीक्षक बंडू मेश्राम आणि पातूर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

