Mahabreaking

[breaking_news]

   Thorny bushes overrun :वारीमार्गावर काटेरी झुडपांचे साम्राज्य; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अपघातांचा धोका वाढला

Thorny bushes overrun : शेगाव–पंढरपूर वारीमार्गावरील जानेफळ–मेहकर दरम्यानच्या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे वाहनचालक, वारकरी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. चार ते पाच वर्षांपूर्वी मोठ्या अपेक्षेने उभारण्यात आलेल्या या वारीमार्गाच्या देखभालीकडे संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून, वेळेत उपाययोजना न झाल्यास गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Thorny bushes overrun

  जानेफळ–मेहकर वारीमार्ग धोकादायक; झुडपांमुळे वाहनचालक, वारकरी त्रस्त

हिवराखुर्द: शेगाव–पंढरपूर वारीमार्गावरील जानेफळ–मेहकर दरम्यानच्या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे वाहनचालक, वारकरी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. चार ते पाच वर्षांपूर्वी मोठ्या अपेक्षेने उभारण्यात आलेल्या या वारीमार्गाच्या देखभालीकडे संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून, वेळेत उपाययोजना न झाल्यास गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

यापूर्वी या मार्गावर ठिकठिकाणी तडे व चिरा पडल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. आता मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी काटेरी झुडपांनी अक्षरशः साम्राज्य निर्माण केले आहे. अनेक ठिकाणी झुडपे रस्त्यावर झुकल्याने समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. परिणामी वळणांवर आणि अरुंद भागात वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून, दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

पावसाळ्यात झुडपांची वाढ अधिक वेगाने होत असल्याने रस्त्याची रुंदी कमी झाल्याचा भास निर्माण होतो. वाहन बाजूला घेताना काटेरी फांद्या वाहनांना घासतात, तर समोरून अचानक एखादे वाहन आल्यास अपघाताची शक्यता वाढते. विशेष म्हणजे, या मार्गावरून दररोज वारकरी, शेतकरी, विद्यार्थी आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात प्रवास करीत असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, वारीमार्गाच्या उभारणीसाठी मोठा निधी खर्च करण्यात आला; मात्र त्याच्या नियमित देखभालीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. रस्त्याच्या कडेला वाढलेली झुडपे हटविणे, गवताची साफसफाई करणे आणि रस्ता सुरक्षित ठेवणे ही संबंधित यंत्रणेची जबाबदारी असतानाही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली.

नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधित प्रशासनाने तातडीने या मार्गावरील काटेरी झुडपांची छाटणी करून रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवालही नागरिक उपस्थित करीत आहेत.

वारीमार्ग हा केवळ वाहतुकीचा रस्ता नसून हजारो वारकऱ्यांच्या श्रद्धेशी जोडलेला मार्ग आहे. त्यामुळे या मार्गाची नियमित देखभाल करून सुरक्षितता सुनिश्चित करणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे मत परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top