Laborer attacked : शहरातील अहिंसा मार्ग परिसरात किरकोळ वादातून एका ५८ वर्षीय मजुरावर लाकडी काठीने हल्ला करून गंभीर मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

शिवीगाळीच्या वादाचे हिंसक रूप; डोक्यात काठी मारून जखमी, तिघांवर गुन्हा दाखल
गजानन तिडके
देऊळगाव राजा : शहरातील अहिंसा मार्ग परिसरात किरकोळ वादातून एका ५८ वर्षीय मजुरावर लाकडी काठीने हल्ला करून गंभीर मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद सोनाजी वाघमारे (वय ५८, व्यवसाय – मजुरी, रा. व्यंकटेश कॉलेजच्या पाठीमागे, देऊळगाव राजा) यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीनुसार, १६ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजता ते अहिंसा मार्ग येथील तुकाराम राऊत यांच्या टपरीजवळ बसले असताना आरोपी सखाराम शाम वाघमारे तेथे आला. कोणतेही कारण नसताना त्याने फिर्यादीला शिवीगाळ करून तेथून निघून गेला. काही वेळानंतर सखाराम वाघमारे आणि गजानन शाम वाघमारे हे दोघे पुन्हा तेथे आले आणि फिर्यादीला शिवीगाळ केल्याचा जाब विचारू लागले.
यावेळी फिर्यादीने सखाराम वाघमारे यालाच प्रथम शिवीगाळ केल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपी सखाराम याने कुणाल आनंद वाघमारे याला फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. कुणाल हा हातात लाकडी काठी घेऊन आला आणि कोणतीही चर्चा न करता फिर्यादीच्या डोक्यावर, पाठीवर आणि डाव्या हातावर काठीने वार केले. या मारहाणीत फिर्यादीच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला, तर डाव्या हाताला सूज आली.
जखमीवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर आणि वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे फिर्यादीने १८ जुलै रोजी रात्री ९.१५ वाजता देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी सखाराम शाम वाघमारे, गजानन शाम वाघमारे आणि कुणाल आनंद वाघमारे (सर्व रा. अहिंसा मार्ग, देऊळगाव राजा) यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक ३२७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ३५२, ३५१(२), ३५१(३) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा पोलीस हेड कॉन्स्टेबल चमकुरे यांनी नोंदविला असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार नारायण गिते करीत आहेत.

