Truck driver arrested! : राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पैलपाडा नजीक झालेल्या भीषण अपघातातील अज्ञात ट्रक आणि चालक अखेर पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. २१ ऑक्टोबर रोजी रात्री झालेल्या या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला होता, तर एक जण गंभीर जखमी झाला होता.घटनेनंतर ट्रकचालक पसार झाला होता. मात्र, कोणताही ठोस धागादोरा नसतानाही पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे गुजरात राज्यातून संबंधित ट्रकसह चालकाला अटक केली.अझरुद्दीन इंद्रिश मिया (रा. कोलकाता) असे आराेपीचे नाव आहे.

अखेर घटनेतील ट्रकसह चालक गुजरातमधून अटक : बोरगाव मंजू पोलिसांचा तपास यशस्वी
संजय तायडे
बोरगाव मंजू : राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पैलपाडा नजीक झालेल्या भीषण अपघातातील अज्ञात ट्रक आणि चालक अखेर पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. २१ ऑक्टोबर रोजी रात्री झालेल्या या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला होता, तर एक जण गंभीर जखमी झाला होता.घटनेनंतर ट्रकचालक पसार झाला होता. मात्र, कोणताही ठोस धागादोरा नसतानाही पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे गुजरात राज्यातून संबंधित ट्रकसह चालकाला अटक केली.अझरुद्दीन इंद्रिश मिया (रा. कोलकाता) असे आराेपीचे नाव आहे.
दिवाळीच्या रात्री सुमारे दहा वाजताच्या सुमारास धीरज शालीग्राम सिरसाठ (३५) आणि त्यांची पत्नी अश्विनी धीरज सिरसाठ (३०) हे दाम्पत्य आपले ‘छोटा हत्ती’ (क्र. MH-30-AB-2006) हे वाहन घेऊन मानकी (ता. कारंजा) येथे जात होते. मार्गात वाहनात अचानक बिघाड झाल्याने त्यांनी प्रवास थांबवून परतीच्या प्रवासाची तयारी सुरू केली. या दरम्यान त्यांनी दुसऱ्या वाहनचालकांना मदतीसाठी फोनद्वारे संपर्क साधला. आरिफ खा अहमद खा (२८) आणि अन्वर खा अब्दुल खा (२५) हे दोघे त्याठिकाणी मदतीसाठी आले. वाहन टोचन करण्याची तयारी सुरू असतानाच भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात मालवाहू वाहनाने चारही जणांना चिरडले.
या अपघातात धीरज सिरसाठ, अश्विनी सिरसाठ आणि आरिफ खा अहमद खा यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्वर खा अब्दुल खा गंभीर जखमी झाले. अपघातानंतर सदर वाहन चालक पसार झाला होता.
नातेवाईकांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला. कुठलाही धागादोरा नसतानाही पोलिसांनी तांत्रिक माहितीचा वापर करून तपासाची चक्रे फिरवली. जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल गोपाळ, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे, हेडकॉन्स्टेबल सचिन सोनटक्के, अक्षय देशमुख, शेखर कोद्रे, पंकज बोराखडे आणि गोपाल ठोंबरे यांच्या पथकाने तांत्रिक तपासाद्वारे मालवाहू ट्रक क्रमांक WB-23-D-8306 हा कोलकाता ते सुरत या मार्गावर असल्याचे शोधून काढले. त्याआधारे पोलिसांनी गुजरातमध्ये छापा टाकून चालक अझरुद्दीन इंद्रिश मिया (रा. कोलकाता) यास ट्रकसह ताब्यात घेतले. चौकशीत चालकाने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याला अटक करण्यात आली आहे.घटनेचा पुढील तपास बोरगाव मंजू पोलिस करीत आहेत.

