Mahabreaking

[breaking_news]

Teachers away from schools :BLOच्या कामामुळे शिक्षक शाळेबाहेर; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम, पालक आक्रमक 

Teachers away from schools :मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावलोकन (Special Intensive Revision-SIR) मोहिमेसाठी जिल्हा परिषद शाळांतील मोठ्या संख्येने शिक्षकांची बूथ लेव्हल अधिकारी (BLO) म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने शाळांमधील अध्यापनावर परिणाम होत असल्याची बाब समोर आली आहे. शिक्षक दिवसभर मतदार पडताळणीच्या कामात व्यस्त राहत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून पालकांमध्ये नाराजी वाढत आहे.

Teachers away from schools

 मतदार पडताळणीचा ताण शिक्षकांवर; अध्यापन विस्कळीत, शाळा बंद करण्याचा इशारा

बबन फेपाळे

रुईखेड मायंबा  : मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावलोकन (Special Intensive Revision-SIR) मोहिमेसाठी जिल्हा परिषद शाळांतील मोठ्या संख्येने शिक्षकांची बूथ लेव्हल अधिकारी (BLO) म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने शाळांमधील अध्यापनावर परिणाम होत असल्याची बाब समोर आली आहे. शिक्षक दिवसभर मतदार पडताळणीच्या कामात व्यस्त राहत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून पालकांमध्ये नाराजी वाढत आहे.

जिल्हाभरातील अनेक शिक्षकांना मतदार पडताळणीसाठी गावोगावी जावे लागत आहे. महसूल विभागाने या कामासाठी अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, रोजगार सेवक आणि स्वस्त धान्य दुकानदार यांची मदतनीस म्हणून नियुक्ती केली असली, तरी अनेक ठिकाणी अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची खंत शिक्षकांनी व्यक्त केली आहे. अंतिम जबाबदारी BLO म्हणून शिक्षकांवरच असल्याने संपूर्ण कामाचा ताण त्यांच्यावर येत आहे.

मतदार पडताळणीचे काम पूर्ण केल्यानंतर रात्री उशिरापर्यंत ऑनलाइन माहिती भरण्याचे काम शिक्षकांना करावे लागत आहे. अनेक शिक्षक मध्यरात्रीपर्यंत डेटा फीडिंग करत असून त्यासाठी घरातील सदस्यांचीही मदत घ्यावी लागत असल्याने मानसिक ताण वाढत असल्याचे चित्र आहे.

शिक्षकांचे म्हणणे आहे की, संबंधित यंत्रणांनी सक्रिय सहकार्य केल्यास पुनरावलोकनाचे काम वेळेत पूर्ण होईल आणि अध्यापनाकडे अधिक लक्ष देता येईल. सध्या अनेक शाळांमध्ये “विद्यार्थी शिक्षकांना शोधत आहेत, तर शिक्षक मतदारांना शोधत आहेत,” अशी परिस्थिती निर्माण झाली असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.

रुईखेड मायंब्यात शाळाबंद आंदोलनाचा इशारा

बुलढाणा तालुक्यातील रुईखेड मायंबा येथील जिल्हा परिषद शाळेत आधीच शिक्षकांची कमतरता आहे. त्यात काही शिक्षकांना BLOची जबाबदारी देण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीने केला आहे.

अतिरिक्त शिक्षक उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, दोन दिवसांत शिक्षकांची नियुक्ती न झाल्यास शनिवारपासून शाळाबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पालक अनिल वाघ म्हणाले, “शाळेत शिक्षकांची संख्या अपुरी असल्यामुळे मुलांच्या शिक्षणाचे नुकसान होत आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास मुलांना जिल्हा परिषद शाळेतून काढून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश देण्याचा विचार करावा लागेल.”

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले, “शाळेला शिक्षक मिळावेत यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. दोन दिवसांत शिक्षकांची नियुक्ती न झाल्यास शनिवारपासून शाळाबंद आंदोलन करण्यात येईल. याबाबतचे निवेदन प्रशासनाला दिले आहे.”

सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल फेपाळे म्हणाले, “मागील वर्षी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून अनेक विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत दाखल झाले होते. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही शाळेला भेट देऊन कौतुक केले होते. मात्र, यावर्षी शिक्षकांच्या कमतरतेमुळे शाळेचा पट कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे.”

शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण

याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी सांगितले की, “सध्या शिक्षक भरतीची जाहिरात प्रक्रिया सुरू आहे. पदोन्नतीबाबत न्यायालयाने शासनाला तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पुढील आदेश येईपर्यंत पदोन्नती प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आली आहे. तसेच इतर दोन पदांबाबत समायोजनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आवश्यकतेनुसार शिक्षक उपलब्ध करून दिले जातील.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top